प्रसाद शिरगावकर
आपल्या डोळ्यांना जे दिसत आहे तेच सत्य आहे, असं मानत आपण जगत असतो. मात्र स्टारट्रेल्स आणि डीप स्काय फोटोग्राफी करायला लागलो, की आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही, अशा एका अनंत मोठ्या विश्वाचा आणि अज्ञेय वैश्विक अस्तित्वाचा आपण चिमुकला भाग आहोत ह्याची पदोपदी जाणीव होत राहते.
वरच्या फोटोत जो डावीकडे त्रिकोणी आकाराचा दिसतोय तो लिंगाणा किल्ला आणि त्याच्या उजवीकडे जो सपाट पठाराचा भाग दिसतोय तो स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला. रायगडावर जो दिवा दिसतोय, तो जगदीश्वराच्या मंदिरात तेवत असलेला दिवा आणि वर आकाशातून येणाऱ्या ज्या प्रकाशरेषा दिसत आहेत, त्या नभोमंडळात रात्री १० ते १२ ह्या दोन तासांत प्रवास करत असलेल्या तारका! लिंगाण्याशेजारच्या रायलिंग पठारावरून रात्री १० ते १२ ह्या दोन तासांत घेतलेल्या सुमारे अडीचशे फोटोंना एकत्र विणून तयार केलेला हा फोटो आहे!