

Stock market outlook India
esakal
पुढील तीन महिने सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना आव्हानात्मक आहेत. आपले मानसिक संतुलन ताब्यात ठेवून चांगले शेअर हातातून निघून जाणार नाहीत ह्याकडे बघावे लागेल. तसेच चांगली गुणवत्ता असलेले बरेच शेअर बाजारात वाजवी भावात मिळत आहेत. कागदी तोट्याकडे दुर्लक्ष करून टप्प्याटप्प्याने ते जमा करता येतील.
समोर छानसे भोजन वाढून ठेवलेले असावे आणि पहिला घास घेताना आमटीतून घासात माशी पडलेली दिसावी, त्याला म्हणतात प्रथमग्रासे मक्षिकापातः... सध्या तसेच झाले आहे. शुक्रवारी, २ जानेवारी रोजी निफ्टीने १ डिसेंबर २०२५ला केलेला उच्चांक सर करून २६३२८ अंशाला गवसणी घातली. विशेष महत्त्वाचे म्हणजे निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी ५००, स्मॉलकॅप, मिडकॅप सारेच शेअर वाढले. बँक निफ्टीच्या नेतृत्वाखाली सर्व शेअर बाजार मरगळ झटकून ताज्या दमाने नवी दौड करता झाला. पण हाय रे दैवा, पुढे असे काही फासे पडले की शुक्रवारची तेजी हा ‘बुल ट्रॅप’ (म्हणजे बिबट्याला पिंजऱ्यात अडकवायला एखादी शेळी ठेवावी असे) तर नव्हता ना अशी शंका यावी. तेजीवाले आणि मंदीवाले असे बुद्धिबळाचे डाव सतत खेळत असतात. एखाद्या चांगल्या बातमीच्या पाठीवर स्वार होऊन तेजीचे पंटर्स खरेदीला उभे राहिले, की ती खरेदी सुरू असेपर्यंत मंदीवाले हू का चू करीत नाहीत, मात्र दुसऱ्या दिवसापासून घमासान विक्री सुरू होते. जुन्या पोझिशन्स सांभाळताना आधीच पंटर्सच्या नाकीनऊ आलेले असतात, त्यात नव्या खरेदीचा भरणा करताना तेजीवाल्यांचे कंबरडे मोडून जाते, मग येतो बाजारात हाहाःकार. गेल्या शुक्रवारी, म्हणजे ९ तारखेला निफ्टी रोजच खाली जात २६३४०वरून २५६८३वर येऊन थांबली. मार बसला नाही असे कुठलेच क्षेत्र उरले नव्हते.