

India Tourism Data Compendium 2025
esakal
शंतनू परांजपे
विदेशी पर्यटकांचा आकडा १०० दशलक्षांपर्यंत नेण्याचे आणि ट्रिलियन डॉलरची पर्यटन अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पूर्ण करणे भारतासाठी अजिबात अशक्य नाही. आपल्याकडे जगातील सर्वात प्राचीन संस्कृती, वैविध्यपूर्ण भौगोलिक आणि अथांग ऐतिहासिक वारसा आहे. युरोपच्या धर्तीवर जर आपण पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि जागतिक दर्जाचे पर्यटन अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित केले, तर आगामी काळात भारत जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेत नक्कीच अव्वल स्थानावर पोहोचेल.
पर्यटन हा केवळ फावल्या वेळेतील विरंगुळा नसून, तो कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा कणा असतो. गेल्या नऊ वर्षांपासून भारतभर सातत्याने प्रवास करत असताना आणि आमच्या हेरिटेज टुरिझम कंपनीच्या माध्यमातून या क्षेत्राचा अत्यंत जवळून अभ्यास करत असताना, मला पर्यटनातील अनेक बारकावे समजले. एक चार्टर्ड अकाउंटंट या नात्याने मी जेव्हा पर्यटनाकडे पाहतो, तेव्हा मला केवळ ऐतिहासिक वास्तू किंवा निसर्गसौंदर्य दिसत नाही, तर त्यामागील अर्थशास्त्र, रोजगारनिर्मितीची प्रचंड क्षमता आणि परकीय चलनाची अब्जावधींची उलाढालदेखील दिसते. मला एक गोष्ट नेहमी प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे - आपल्या देशात पर्यटनाची अफाट आणि अमर्याद क्षमता आहे, पण त्याचे अचूक आर्थिक मूल्यमापन होणे आणि जागतिक दर्जाच्या सोयी पुरवणे या आजच्या काळातील सर्वात मोठ्या गरजा आहेत.