Summer Dessert : रसमलाई, दुधाचे थंडगार डेझर्ट, ब्रेड कलाकंद, आंब्याचे थंडगार पुडिंग, खरवस..!

रखरखीत उन्हात घ्या थंडगार पदार्थांचा आनंद
Summer Dessert
Summer DessertEsakal
Updated on

सुजाता नेरूरकर

इन्स्टंट मिल्क ब्रेड रसमलाई

साहित्य

सहा ब्रेड स्लाइस, २ कप दूध (फुल क्रीम), २ टेबलस्पून पिठीसाखर, २ टेबलस्पून मिल्क पावडर, पाव कप केशर घातलेले दूध, १ टीस्पून वेलची पूड, सुकामेवा (तुकडे करून).

सारणासाठी

दोन टेबलस्पून मिल्क पावडर, १ टेबलस्पून पिठीसाखर, १ टेबलस्पून क्रीम, १ टेबलस्पून दूध, सजावटीसाठी सुकामेवा, गुलाब पाकळ्या.

कृती

फुल क्रीम दूध थंड घ्यावे. त्यामध्ये पिठीसाखर, मिल्क पावडर, वेलची पूड, सुकामेव्याचे तुकडे घालावेत. मग दूध फ्रीजमध्ये परत थंड करायला ठेवावे. सारण करण्यासाठी एका बाऊलमध्ये पिठीसाखर, मिल्क पावडर, क्रीम, वेलची पूड व थोडेसे दूध घालून मिक्स करून घ्यावे. एका प्लेटमध्ये ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्याच्या कडा कापून घ्याव्यात. मग एक ब्रेडची स्लाइस घेऊन त्यावर थोडेसे सारण लावावे. सारणावर दुसरी स्लाइस ठेवावी आणि त्याचे चार त्रिकोणी भाग करावेत. सर्व ब्रेड स्लाइसला अशा पद्धतीने सारण लावून ४-४ तुकडे करावेत. एका खोलगट प्लेटमध्ये ब्रेडचे सर्व तुकडे मांडून घ्यावेत. त्यावर थोडे थोडे साधे दूध घालावे. त्यावर तयार केलेले थंड दूध घालावे. वरून सुकामेव्याने सजवून थंड करून सर्व्ह करावे.

दुधाचे थंडगार डेझर्ट

साहित्य

दोन कप दूध (फुल क्रीम), ८ टोस्ट, २ टेबलस्पून कस्टर्ड पावडर, २ टेबलस्पून मिल्क पावडर, ३ टेबलस्पून साखर, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, सजावटीसाठी सुकामेवा.

साखरेच्या पाकासाठी

अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी पाणी.

कृती

साखरेचा पाक करण्यासाठी एका भांड्यात साखर व पाणी मिक्स करावे. एकतारी पाक तयार करून त्यामध्ये केशर घालून बाजूला ठेवावे. सुकामेव्याचे तुकडे करून घ्यावेत. एका पॅनमध्ये दूध, मिल्क पावडर व कस्टर्ड पावडर मिक्स करून ते मिश्रण मंद विस्तवावर ठेवावे. साधारणपणे ८-१० मिनिटांत मिश्रण घट्ट व्हायला लागेल. मग त्यामध्ये साखर व व्हॅनिला इसेन्स घालावा. मिश्रण परत घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावे. मग विस्तव बंद करून पॅन खाली उतरवून घ्यावा. एका चौकोनी ट्रेमध्ये ४ टोस्ट पसरून ठेवावेत. त्यावर निम्मा साखरेचा पाक एकसारखा ओतून घ्यावा. मग त्यावर कस्टर्डचे निम्मे मिश्रण ओतावे. मग त्यावर उरलेले चार टोस्ट पसरून ठेवावेत. त्यावर साखरेचा पाक ओतावा व परत त्यावर कस्टर्डचे मिश्रण ओतावे. वरून सुकामेव्याने सजवावे. आता डेझर्ट तयार झाले आहे. फ्रीजमध्ये तासभर थंड करून सर्व्ह करावे.

इन्स्टंट रबडी

साहित्य

अर्धा लीटर दूध (फुल क्रीम), अर्धा वाटी साखर, १ टीस्पून वेलची पावडर, २ टेबलस्पून मिल्क पावडर, अर्धा कप दूध, २ टेबलस्पून गव्हाचे पीठ, सुकामेवा, थोडेसे केशर.

कृती

रबडी करण्यासाठी फुल क्रीमचे दूध वापरावे. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवावे. सुकामेव्याचे तुकडे करून घ्यावेत. एक बाऊलमध्ये मिल्क पावडर व गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये दूध घालावे. सर्व मिक्स करावे. गुठळी राहता कामा नये. दुधाला उकळी आली, की त्यामध्ये मिल्क पावडर व गव्हाच्या पिठाचे मिश्रण हळूहळू घालावे. मंद आचेवर मिश्रण मिक्स करत जावे. दूध घट्ट व्हायला लागले, की त्यामध्ये साखर घालावी. साखर विरघळली की त्यामध्ये वेलची पूड व सुकामेवा घालून मिक्स करून घ्यावे. रबडी थंड झाल्यावर वरून सुकामेव्याने सजवून सर्व्ह करावी.

ब्रेड कलाकंद

साहित्य

अर्धा लिटर दूध, ४ ब्रेड स्लाइस, अर्धी वाटी साखर, केशर, १ टीस्पून वेलची पूड, सजावटीकरिता सुकामेवा.

कृती

प्रथम दूध आटवायला ठेवावे. दूध आटून निम्मे झाले, की त्यामध्ये साखर, केशर व वेलची पूड घालून मिक्स करावे. त्यामधील अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवावे. मग परत रबडी होईपर्यंत दूध आटवून घ्यावे. ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात. एक चौकोनी ट्रे घेऊन ब्रेड स्लाइस ट्रेच्या मापाच्या कट करून घ्याव्यात. ट्रेमध्ये थोडीशी रबडी पसरून घ्यावी. त्यावर ब्रेड स्लाइस ठेवावेत. वरून बाजूला काढून ठेवलेले थोडे दूध घालावे. पुन्हा थोडी रबडी घालून पसरून घ्यावी. त्यावर अजून एक ब्रेड स्लाइस ठेवावा. त्यावर राहिलेले दूध घालून रबडी पसरावी. शेवटी वरून सुकामेव्याने सजवून, झाकून फ्रीजमध्ये २ तास सेट करायला ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर आपोआप सेट होईल. मग कापून सर्व्ह करावे.

घरगुती मिठाई

साहित्य

एक कप पनीर, १ कप मिल्क पावडर, अर्धा कप दूध, ४ चमचे साखर, १ चमचा तूप, पाव टीस्पून वेलची पूड, सजावटीसाठी सुकामेवा.

कृती

मिठाई करण्यासाठी घरी पनीर करून घ्यावे किंवा बाजारातून पनीर आणले तरी चालेल. पनीर किसून घ्यावे. काजू, बदाम व पिस्ते बारीक चिरून घ्यावेत. स्टीलच्या प्लेटला थोडेसे तूप लावून त्यावर बटर पेपर ठेवावा. त्याला परत थोडेसे तूप लावून ठेवा. नॉनस्टिक पॅनमध्ये किसलेले पनीर घ्यावे. त्यामध्ये दूध व मिल्क पावडर मिक्स करावी. मध्यम आचेवर मिश्रण आटवून घ्यावे. मिश्रण आटायला लागले, की त्यामध्ये साखर व वेलची पूड घालावी. मिक्स करून परत मंद विस्तवावर आटवायला ठेवावे. मिश्रण घट्ट झाले की तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण काढून घ्यावे. बोटांना तूप लावून बोटांनी मिश्रण एकसारखे करून घ्यावे. बाजूने सुकामेव्याचे तुकडे घालून मिठाई सेट करायला ठेवावी. पाहिजे असल्यास फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवावे. सेट झाल्यावर तुकडे कापून मिठाई सर्व्ह करावी.

आंब्याचे थंडगार पुडिंग

साहित्य

एक मोठा हापूस आंबा (गर काढून), १ कप दूध, अर्धा कप साखर, ३ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, पाव कप दूध, सजावटीसाठी आंबा किंवा चेरी.

कृती

आंबा चांगला स्वच्छ धुऊन त्याचा रस काढून घ्यावा. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर व दूध मिक्स करून घ्यावे. गुठळी राहता कामा नये. मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा रस, साखर व दूध घालून ब्लेंड करून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये आंब्याचे ब्लेंड केलेले मिश्रण काढून ५ मिनिटे शिजवून घ्यावे. मग त्यामध्ये कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घालून मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावे. कॉर्नफ्लोअरमुळे मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागेल. मग विस्तव बंद करून मिश्रण थोडे थंड करायला ठेवावे. मिश्रण थोडे थंड झाल्यावर स्टीलच्या डेकोरेटिव्ह बाऊलमध्ये काढून एकसारखे करून घ्यावे. मग फ्रीजमध्ये थंड करून प्लेटमध्ये काढून आंब्याच्या फोडींनी किंवा चेरीने सजवून सर्व्ह करावे.

खरवस

साहित्य

दोन कप चिक, आवश्यकतेनुसार दूध, अर्धा कप साखर, १ टीस्पून वेलची पूड, ७-८ केशर काड्या, पाव टीस्पून जायफळ.

कृती

एका स्टीलच्या भांड्यात गाईचा किंवा म्हशीचा चिक घेऊन त्यानुसार दूध घालावे. मग साखर, वेलची पूड, जायफळ पूड व केशर घालून चांगले मिक्स करावे. एक मोठ्या आकाराचे स्टीलचे भांडे घेऊन त्यामध्ये २-३ ग्लास पाणी घालावे. पाणी गरम झाले की भांड्याच्या आकाराची खोलगट स्टीलची प्लेट भांड्यावर ठेवून त्या प्लेटमध्ये चिक घालावा. वरून झाकण ठेवावे. मध्यम विस्तवावर १२-१५ मिनिटे वाफेवर चिक शिजवून घ्यावा. मग स्टीलची प्लेट काढून खरवस थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर त्याच्या चौकोनी वड्या कापून फ्रीजमध्ये २-३ तास थंड करायला ठेवाव्यात. थंड झाल्यावर खरवस सर्व्ह करावा.

टीप

चिक कोणत्या दिवशीचा आहे त्याप्रमाणे दूध वापरावे. खरवसाच्या वड्या फ्रीजमध्ये ७-८ दिवस छान राहतात.

हेल्दी लेफ्टओव्हर बनाना

साहित्य

दोन पिकलेली केळी, अर्धा कप साखर, अर्धा कप दूध, १ कप गव्हाचे पीठ, १ टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा किंवा पावडर, तळण्यासाठी तेल.

कृती

दोन पिकलेली केळी सोलून चिरून घ्यावीत. मिक्सरच्या भांड्यात चिरलेली केळी, साखर व दूध ब्लेंड करून एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. मग त्यामध्ये गव्हाचे पीठ थोडे थोडे घालून मिक्स करावे. आता त्यामध्ये वेलची पूड व बेकिंग सोडा घालून हळुवारपणे मिक्स करावे. मिश्रण चांगले मिक्स झाले पाहिजे, मिश्रण चमच्याने वरून सोडले तर रिबिनीसारखे पडले पाहिजे. कढईमध्ये तेल गरम करून चमच्याच्या मदतीने छोटे छोटे पकोड्यासारखे गोळे तेलात सोडावेत. मध्यम विस्तवावर छान कुरकुरीत तळून घ्यावेत. अशा प्रकारे सर्व गोळे तळून घेऊन गरम गरम सर्व्ह करावे.

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com