सोनिया उपासनी
पेस्टल शेड्समधील अनेक रंग उन्हाळ्यातही बहार आणतात. पेल ब्लू, व्हाइट-पिंक, पेस्टल ब्लू, पेस्टल टरक्वॉइज, मिंट ग्रीन या काही प्रमुख शेड्सचा वापर करून तुम्ही हटके, आय कॅची लुक मिळवू शकता.
तापमान आता ४० अंशाला येऊन टेकले आहे. प्रखर सूर्यकिरणे आणि गरम वारे यांमुळे दैनंदिन काम करतानाही अगदी नकोसे होते. बाहेर कितीही उन्हाचा प्रकोप असला तरी रोजची कामे काही पुढे ढकलता येत नाहीत. त्यामुळे रोज कामानिमित्ताने होणारा छोटा-मोठा प्रवास अटळ आहे. अशावेळी घराबाहेर पडताना आरोग्याची काळजी घेणे अत्याधिक महत्त्वाचे ठरते.
आपल्या शरीराचे तापमान व्यवस्थित राखण्यासाठी विशिष्ट रंगांचे व विशिष्ट टेक्स्चरचे कपडे वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विचार न करता तुम्ही जर सिंथेटिक व गडद रंगाचे कपडे परिधान केले, तर अशा कपड्यांनी जास्त प्रमाणात सूर्यकिरणे शोषून घेतल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. उष्णतेमुळे त्वचेची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे अशा एक ना अनेक समस्या उद्भवू शकतात. याकरिता कोणत्या रंगाचे कपडे उन्हाळ्यात घालणे योग्य आहे आणि कोणते रंग वापरणे टाळावे हे आपण जाणून घेऊ या.