

सुप्रिया खासनीस
उन्हाळा म्हटलं की वाळवणं करण्याची लगबग सुरू होते. मग ही वर्षभर टिकणारी वाळवणं करण्यासाठी शेजारपाजारच्या बायकांना साद घातली जाते. सुखंदुःखं एकमेकींना सांगितली जातात. मधेच मुलं लुडबुड करत कच्चे पापड, कुरडया खातात. हळूहळू वाळवणाचं रूपांतर आठवणींत कधी होतं कळतही नाही. काही ठरावीक वाळवणं उन्हाळ्याच्या दिवसांत हमखास केली जातात. असेच काही पारंपरिक वाळवणांचे पदार्थ...
पापड
हिरव्या मिरचीचे पापड साहित्य : अर्धा किलो उडीद डाळ, ५० ग्रॅम हिंग, १० ग्रॅम पांढरे मिरे, १५ ते २० ग्रॅम पापड खार, १० ते १५ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ. कृती : उडदाची डाळ दळताना डाळीबरोबर मिरेही दळावेत. मिरे पूड भरडसर हवी असेल तर दळताना घालू नये. वेगळी भरड करावी. मिरच्यांची देठे काढावीत व त्यावर गरम पाण्याचे आधण ओतावे. गार झाल्यानंतर मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. डाळीच्या पिठात हिंग, पापड खार, मिठाबरोबरच वाटलेल्या मिरच्या घालून पीठ चांगले भिजवावे. मग हे पीठ चार ते पाच तास तसेच ठेवावे. नंतर या पिठाचे पापड लाटून दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवावेत व डब्यात भरून ठेवावेत.
तांदळाचे पापड (खिचे)
साहित्य : अर्धा किलो तांदळाचे पीठ, १० ग्रॅम पापड खार, २ चमचे जिरे, पिठाच्या दुप्पट पाणी, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल.
कृती : प्रथम पीठ वाटीने मोजून घ्यावे. जेवढे पीठ असेल, त्याच्या दुप्पट पाणी पातेल्यात उकळायला ठेवावे. पाणी उकळू लागल्यानंतर त्यात पापड खार, जिरे व मीठ घालून चांगली उकळी आणावी. उकळत्या पाण्यात हळूहळू पीठ घालावे. पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून पीठ सारखे हलवत राहावे. पीठ चांगले शिजल्यानंंतर झाकण ठेवून वाफ आणावी. गॅस बंद करावा. पीठ कोमट असताना चांगले मळून घ्यावे. पिठाचा गोळा करावा. तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून प्लॅस्टिकच्या साह्याने पापड लाटून दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवावेत.
नाचणीचे पापड
साहित्य : दोन वाट्या नाचणीचे पीठ, ४ वाट्या पाणी, १ चमचा पापड खार, २ चमचे जिरे, २ चमचे तीळ किंवा खसखस, चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. पाण्यात जिरे, पापड खार व मीठ घालावे. पाणी चांगले उकळू लागले, की गॅस कमी करून हळूहळू त्यात नाचणीचे पीठ घालावे व एकसारखे ढवळत राहावे. पिठात गुठळ्या होऊ देऊ नयेत. मग या पिठाची मंद आचेवर पाच मिनिटे वाफ काढावी. गॅस बंद करावा. पीठ गरम असतानाच चांगले मळून घ्यावे. नंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून प्लॅस्टिकच्या साह्याने पातळ पापड लाटावेत. हे पापड कडक उन्हात वाळवावेत.