किशोर पेटकर
निवृत्ती घेतलेल्या सुनील छेत्रीला भारतीय फुटबॉल संघाच्या कमकुवत कामगिरीमुळे अवघ्या नऊ महिन्यांतच पुनरागमन करावे लागले. संघात हमखास गोल करणारा खेळाडू नसल्याने प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी ४० वर्षीय छेत्रीचे पुनरागमनासाठी मन वळवले. क्लब स्तरावर शानदार प्रदर्शन करणाऱ्या छेत्रीने मैदानावर पुनश्च कमबॅक करत संघाला बळ दिले असून, आगामी आशिया करंडक पात्रता फेरीसाठी त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल.
भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीने गतवर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा निरोप घेतला. तब्बल १९ वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीत दीडशेहून जास्त सामने खेळला. फुटबॉल संघाच्या या कर्णधाराने तृप्त मनाने आंतरराष्ट्रीय मैदानाला अलविदा केले होते, पण नऊ महिन्यांतच त्याच्यावर निर्णय फिरविण्याची पाळी आली. कारण स्पष्टच आहे, छेत्रीच्या अनुपस्थितीत भारतीय फुटबॉलची आंतरराष्ट्रीय घसरण कायम राहिली.