

India squad for T20 World Cup 2026
esakal
अष्टपैलू अक्षर पटेल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. मात्र खुद्द कर्णधार सूर्यकुमार दबावाखाली आहे. गेल्या वर्षभरात ‘३६० डिग्री’ क्रिकेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूची बॅट धावांना भुकेलेली दिसली. स्काय (एसकेवाय) या टोपणनावाने क्रिकेटप्रेमींत चर्चित असलेला सूर्या फलंदाजीत पुन्हा कोलमडला, तर त्याच्या कारकिर्दीबाबतही निवड समिती गांभीर्याने विचार करेल हे स्पष्टच आले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जून २०२४मध्ये कॅरिबियन भूमीत क्रिकेटचा टी-२० विश्वकरंडक जिंकला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊन येथे झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी हरविले. टी-२० विश्वकरंडक जिंकण्याची ती भारतीय क्रिकेट संघाची दुसरी वेळ ठरली. २००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा जगज्जेतेपद मिळविले, तेव्हा ती टी-२० क्रिकेटची सुरुवात होती. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनंतर देशात टी-२० क्रिकेटमधील विश्वविजेतेपदाचा जल्लोष झाला. आता सात फेब्रुवारीपासून भारत व श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकासाठी वीस संघांत लढती होणार आहेत. सहभागी संघांची संख्या वाढली, तरी खरी चुरस कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख संघांतच असेल. दोन्ही यजमान देश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान हे देश विश्वकरंडकासाठी स्पर्धक आहेत. झटपट क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजला नजरेआड करता येत नाही. अफगाणिस्तान व बांगलादेशमध्ये धक्कादायक विजय नोंदविण्याची क्षमता आहे. आयर्लंड संघही काही वेळा चकीत करणारे निकाल नोंदवू शकतो. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाचीच जास्त चर्चा होईल. विश्वकरंडक विजेतेपद राखण्याचे दडपण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीने भारतीय संघाची सज्जता स्पष्ट होईल.