Premium|Sweet Corn Karanji : मक्यापासून बनवा कुरकुरीत करंज्या आणि गरमागरम स्वीट कॉर्न सूप

Crispy Sweet Corn Karanji : मक्याच्या दाण्यांपासून बनणाऱ्या कुरकुरीत करंज्या आणि चविष्ट स्वीट कॉर्न सूपच्या सोप्या पाककृती जाणून घ्या. कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हे दोन्ही पदार्थ सहज तयार करता येतात.
Crispy Sweet Corn Karanji

Crispy Sweet Corn Karanji

esakal

Updated on: 

सुप्रिया खासनीस

करंज्या

वाढप

मध्यम आकाराच्या १२ ते १५ करंज्या.

साहित्य

तीन वाट्या मक्याचे दाणे, अर्धी वाटी मुगाची डाळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी किसलेले ओले किंवा सुके खोबरे, २ वाट्या मैदा, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर, प्रत्येकी पाव चमचा हळद, मोहरी व हिंग, गरजेनुसार तेल.

कृती

मैद्यामध्ये तेलाचे मोहन घालून मैदा घट्ट भिजवावा. मक्याचे दाणे, भिजवलेली मुगाची डाळ व हिरव्या मिरच्या मिक्सरमधून दाटसर वाटून घ्याव्यात. कढईत तेल तापवून त्यात हळद, मोहरी व हिंग घालून फोडणी करावी. त्यामध्ये मक्याच्या दाण्याचे वाटलेले मिश्रण घालावे आणि चांगले परतून घ्यावे. त्यावर झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. मग त्यात मीठ व साखर घालून एकजीव करावे व मिश्रण कोरडे होऊ द्यावे. सारण गार झाल्यानंतर त्यात खोबरे, कोथिंबीर व लिंबाचा रस घालावा. मैद्याच्या पाऱ्या लाटून त्यात सारण भरून करंज्या कराव्यात व तेलात तळून घ्याव्यात.

स्विट काॅर्न सूप

वाढप

४ व्यक्तींसाठी.

साहित्य

दोन मोठ्या वाट्या स्वीट कॉर्न दाणे, अर्धी वाटी मटार दाणे, १ बारीक चिरलेली ढोबळी मिरची, १ बारीक चिरलेला कांदा, २ चमचे आले-लसूण-मिरची पेस्ट, अर्धी वाटी काॅर्नफ्लोअर, २ चमचे बटर, गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ व मिरे पूड

कृती

एक वाटी स्वीट कॉर्न दाणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत व उरलेले दाणे बारीक चिरून घ्यावेत. कढईत बटर घालून त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट परतून घ्यावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, मटार व ढोबळी मिरची घालून भाज्या परतून घ्याव्यात. मग मीठ व पाणी घालून मिश्रण शिजवावे. काॅर्नफ्लोअर पाण्यात चांगले कालवून घ्यावे व कढईत थोडे थोडे घालून ढवळून घ्यावे. मिश्रण शिजल्यानंतर मिरे पूड घालावी. सूप दाटसर झाल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेले मक्याचे दाणे घालून सूप सर्व्ह करावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com