

Importance of mental rest
esakal
निकिता जाधव
माणूस म्हणून एका ठरावीक क्षणी आपण किती प्रकारच्या बौद्धिक आणि मानसिक प्रक्रियांना आपल्या मेंदूत जागा देऊ शकतो याला मर्यादा आहेत. ब्रेक ही लक्झरी नाही, तो आपल्या मनासाठी आणि शरीरासाठी गरजेचा विसावा आहे. स्वतःला पॉज देणं ही स्वतःची काळजी घेण्याची सर्वात मोठी कृती असेल.
संगीत हे केवळ स्वरांमध्ये नसतं, तर ते स्वरांमधल्या त्या मोकळ्या, शांत जागांमध्येही असतं. अशा मोकळ्या जागाच एखाद्या सांगीतिक रचनेला अर्थ देतात. आपल्या सगळ्यांचं आयुष्यही याला अपवाद नाही. कधीकधी आपल्यालाही आयुष्यात अशाच काही शांत, मोकळ्या क्षणांची गरज असते. असे शांत क्षण आपल्याला थांबायला, स्वतःकडे बघायला, स्वतःकडे लक्ष द्यायला आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायला मदत करतात.
तुमच्या कधी लक्षात आलंय का? दिवसभरात आपण किती धावपळ करत असतो, किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामं पार पाडत असतो, सकाळपासून रात्रीपर्यंत कामं, जबाबदाऱ्या, अपेक्षा, मोबाईलची नोटिफिकेशन्स अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढे हरवतो, की ‘स्व’ची जाणीव पूर्णपणे मागे पडते. त्यातूनही ‘माझं शरीर थकलंय’ याकडे आपलं लगेच लक्ष जातं, पण ‘माझं मन थकलंय का?’ हे बघायला आपण शिकलोच नाही.
मानसशास्त्रज्ञ म्हणून मी जेव्हा माझ्या आजूबाजूला माझे मित्र, कुटुंब, सहकारी, क्लायंट्स यांच्याकडे पाहते, तेव्हा एक गोष्ट ठळकपणे दिसत राहते, ती म्हणजे बहुतांश लोक मानसिकदृष्ट्या थकलेले आहेत, अतिउत्तेजित (ओव्हरस्टिम्युलेटेड) आणि ताणामुळे दडपलेले व भांबावून (ओव्हरव्हेल्म्ड) गेलेले आहेत. सर्वांना एका ब्रेकची, पॉजची गरज जाणवते, पण तो नेमका कधी आणि कसा घ्यायचा, याबद्दल जागरूकता आणि स्पष्ट कल्पना नाही.