

Tere Ghar Ke Samne
esakal
सुलभा तेरणीकर
सन १९६३ म्हणजे भारतात सिनेमाच्या आगमनाचं सुवर्णजयंती वर्ष. तंत्र आणि कलेचं हे माध्यम नित्य बदलणारं असल्यानं भारतात त्याचं आकर्षण वाढतच चाललं होतं. अगदी सुशिक्षितांपासून सामान्य कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक सिनेरसिक सिनेमाचा मुख्य आश्रयदाता होता. शुक्रवारी प्रदर्शित होणारा सिनेमा, तिकिटांसाठी रांगा, फिल्मी पत्रिका, फोटो आणि त्याहीपेक्षा बहरणारी संगीत उद्योगाची झेप असं सारं काही खुणावणारं होतं. मनोरंजनात्मक, वास्तवदर्शी, कौटुंबिक असा कोणताही सिनेमा प्रेक्षकराजाला खेचून घेत होता.
दो न घराण्यांचं वैर असलेले, तरीही एकमेकांच्या प्रेमात असलेले ‘रोमिओ-ज्युलिएट’ किंवा ‘हीर-रांझा’ किंवा ‘लैला-मजनू’ यांच्यासारखे प्रेमी कधीही एकत्र आले नाहीत. त्या शोकांतिकाच होत्या. पण हिंदी सिनेमात मात्र शेवट गोड! ‘नवकेतन’चा तेरे घर के सामने हा चित्रपट म्हणजे अशीच गोड कथा. त्याचे लेखक, पटकथा, संवाद, दिग्दर्शक गोल्डी म्हणजे विजय आनंद. नायक देव आनंद आणि नायिका नूतन असली, तरी चित्रपटामध्ये एकमेकांचे कट्टर वैरी असलेले राजेंद्रनाथ आणि ओमप्रकाश हे खरे जबरदस्त हिरो म्हणावेत. चिरतरुण संगीत देणारे ज्येष्ठ संगीतकार दादा बर्मन, रोमँटिक गीतं लिहिणारे शायर, गीतकार हसरत जयपुरी यांच्या गाण्यांनी बहार आणली. चित्रपटाच्या कथेचा नायक व्यवसायानं आर्किटेक्ट आहे, त्यामुळेच ‘तेरे घर के सामने’ हे सिनेमाचं शीर्षक समर्पक वाटतं. यातलं ‘एक घर बनाऊंगा’ हे गाणं आकर्षण होतं. त्यात नायकाला ग्लासमध्ये नायिका म्हणजे नूतन दिसते. फोटोग्राफीची कमाल वाटली होती त्यावेळी लोकांना. व्ही. रात्रा हे नवकेतनचे आवडते छायालेखक, सत्यजित रे यांचेही. दुसरं एक गाणं म्हणजे, ‘दिल का भँवर करे पुकार’. या गाण्यात कुतुबमिनारच्या पायऱ्या उतरणारे देव आनंद-नूतन आणि एका दृश्यात दिसणारे विजय आनंद यांचं कोण आकर्षण वाटे रसिकांना! सिमल्याच्या धुक्यातून ‘तू कहाँ ये बता, इस नशीली रात में’ म्हणत प्रेयसीचं घर शोधत जाणारा देव आनंद आणि खिडकीत उभी असलेली नूतन हे सगळंच वेड लावणारं होतं. कथेच्या शेवटी चीनच्या आक्रमणाचा संदर्भ जोडला आहे. तसेच देव आनंद १९५४मध्ये झालेल्या पंडित नेहरू यांनी मांडलेल्या पंचशील कराराचाही उल्लेख करतो. सगळीच कहाणी मजेदार! नवनवे चेहरे येत होते तरी देव आनंदचं आकर्षण होतंच... ‘देखो रूठा ना करो बात नज़रों की सुनो’ ऐकल्यावर तरुणाईचं हृदय उडी मारायचं.
पुढे विजय आनंद हे भारतीय चित्रपटसृष्टीचे एक खंदे दिग्दर्शक झाले, पण ते कौतुकानं म्हणत, ‘आम्ही आनंद, हे आनंद आहोत ते फक्त देव आनंदमुळेच!’
***