

Sustainable Lifestyle through Gardening
esakal
इमारतीच्या गच्चीवर बागकाम करण्याची संकल्पना आधुनिक वाटत असली, तरी तिचा इतिहास खूप जुना आहे. ख्रिस्तपूर्व काळात मेसोपोटेमिया, बॅबिलॉन तसेच पोम्पेई या शहरांमध्ये टेरेस गार्डनिंग करत असल्याचे उल्लेख सापडतात. मेसोपोटेमियामध्ये पायऱ्यांची मंदिरे असत. या मंदिरांना झिग्गुरात म्हणत. या इमारतींच्या पायऱ्यांवर कडक उन्हापासून सावली आणि थंडावा मिळावा या उद्देशाने झाडे आणि फुले लावली जात असत. प्राचीन जगतातील सात आश्चर्यांपैकी एक मानले जाते त्या प्राचीन बॅबिलॉनच्या हँगिंग गार्डन्सबद्दल तर आपण ऐकले असेलच. या बागा नेबुचॅडनेझार राजाने आपल्या राणीसाठी बांधलेल्या होत्या असे मानले जाते. या बागेत मातीच्या विटांनी बांधलेल्या मोठ्या हिरव्यागार डोंगरासारख्या दिसणाऱ्या चढत्या मालिका होत्या. यावर झाडे, झुडपे आणि वेली लावलेल्या होत्या. रोममधील पोम्पेई शहराच्या उत्खननात घरांच्या छतावर बागांचे अवशेष सापडले आहेत. या बागांचा मुख्य उद्देश उन्हाळ्यापासून थोडे संरक्षण मिळवणे हा असावा. या बागा मनोरंजनाचे ठिकाण म्हणूनसुद्धा उपयोगात येत असाव्यात.
अलीकडे शहरांमधून बागकाम करण्याची आवड आजकाल वाढीस लागलेली दिसून येते. अनेकांनी बाल्कनीत आणि गच्चीवर दोन-चार तरी गुलाबाच्या, मोगऱ्याच्या कुंड्या ठेवलेल्या दिसून येतात. ज्यांच्याकडे छोटे किंवा मोठे अंगण आहे त्यांनी अंगणात कौतुकाने काही देखणे वेल, आणि आंबा, पपईसारखी मोजकी फळझाडे लावलेली दिसतात. खरेतर बागकाम म्हणजे फक्त फुलांचे, भाज्यांचे उत्पादन घेणे नाही, तर ती एक परिपूर्ण आणि शाश्वत जीवनशैली आहे.