

Root Vegetable Cultivation
esakal
डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी
गच्चीवर जागा कमी असल्यास कांदा, लसूण, बटाटा यांची लागवड एखाद्या पोत्यातसुद्धा करता येते. माती-वाळू-कंपोस्ट इत्यादींचे मिश्रण गच्च भरून, वरून पोते बांधून त्या पोत्याला सगळ्या बाजूंनी योग्य अंतरावर छोटी छिद्रे करून त्या छिद्रांत कांद्याची रोपे किंवा लसणाची पाकळी किंवा बटाट्याचा डोळे असलेला तुकडा इत्यादींपैकी काहीही खोचून लावावे. छोट्या जागेत एकावर एक अशी दोन पोती ठेवून चांगले पीक घेता येऊ शकते.
मागील लेखांमधून पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या आणि गच्चीवर सहज घेता येतील अशा काही रानभाज्या यांच्या लागवडीविषयी माहिती घेतली. त्या साऱ्या भाज्या मातीच्या पृष्ठभागावर लागतात. आपल्या नित्य आहारात मुळा, लसूण, कांदे, रताळे, आले, हळद यांसारख्या भाज्याही असतात. त्या मातीच्या पृष्ठभागाखाली वाढतात. या कंदभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, फायबर, विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. काहींमध्ये औषधी गुण असतात आणि इतर काहींना आपल्या संस्कृतीने आहारात खास जागा दिलेली दिसून येते. आपल्याला गच्चीवरही कंदभाज्या लावता येऊ शकतात. त्याची माहिती या लेखात घेऊ या.