डॉ. सुनील गोडबोले
मेंदूच्या विकासाची सुरुवात जर सुयोग्य पद्धतीने, वेळच्यावेळी झाली, तर त्याचा थेट परिणाम मुलांच्या सर्वांगिण विकासावर, शैक्षणिक यशावर आणि पर्यायाने सुजाण, संपन्न नागरिक घडविण्यावर होणार आहे. म्हातारपणातील पार्किन्सन्स आजार, स्मृतिभ्रंश, मानसिक विकारांचाही संबंध याच पहिल्या पाच वर्षांतील मेंदूच्या विकासाशी आहे. मुलांच्या मेंदूच्या विकासाच्या टप्प्यांचा वेध...
‘शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी!’ संत तुकाराम महाराजांच्या या वचनाचेच थोडे वेगळे स्वरूप यंदाच्या ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्यदिनाच्या ब्रीदवाक्यात आहे. ‘Healthy Beginnings, Hopeful Futures’ - अर्थात आरोग्यदायी सुरुवात असेल, तर चांगल्या भविष्याची आशा असेल. निरोगी आई, सुरक्षित गरोदरपण, बाळाचा जन्म आणि निरोगी बाळ - अशा गरोदरपणाचे २७० दिवस आणि बाळाच्या पहिल्या दोन वर्षांचे ७३० दिवस मिळून एक हजार दिवसांच्या कालखंडात माता आणि बाळाची काळजी घेण्यावर यावेळेस जागतिक आरोग्य संघटनेचा भर आहे.