विश्वाचे आर्त ।डॉ. सदानंद मोरे
ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे पत्रिकेतील एखाद्या घरात काही ग्रहांची युती होते व त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो त्याप्रमाणे आफ्रिकेत ऱ्होड्स, किपलिंग आणि चर्चिल यांची युती झाली होती आणि गांधी तेव्हा तेथेच असल्यामुळे युतीत जणू आणखी एका ग्रहाची भर पडून, तो चार ग्रहांचा योग झाला होता आणि तोही जगाच्या राजकीय पत्रिकेत मेदिनीय ज्योतिषात, असे म्हणायला हरकत नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिश साम्राज्य ही जगाच्या नकाशावर ठसठशीतपणे दिसून येणारी गोष्ट होती. नेपोलियनचा पराभव केल्यानंतर फ्रान्स सत्तास्पर्धेतून तसा बाजूला पडल्यासारखाच होता. पण जर्मनी हा देश कैसरच्या नेतृत्वामुळे सामर्थ्यवान म्हणजे महासत्ता होण्याच्या मार्गावर होता. हे इतिहासाने १९१४ साली सिद्ध केले.
या सामर्थ्याची चाहूल लागल्यामुळेच की काय, ऱ्होड्स भविष्यकालीन जगात स्वातंत्र्य आणि शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य ज्या महासत्तांकडे सुपूर्त करू पाहत होता त्यात फ्रान्सचा नाही, पण जर्मनीचा समावेश करतो. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की शांतता प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी सामर्थ्याची म्हणजेच सत्तेची आवश्यकता आहे. शांततेची हमी देणे हे महासत्तांचे जणू नैतिक उत्तरदायित्व असते.
मुळात शांती कशाला हवी, हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर स्पष्ट आहे. भांडवलशाहीतील उत्पादन आणि व्यवसाय हे प्रमाणभूत घटक सुरक्षित राखण्यासाठी शांततेला व स्थैर्याला पर्याय नाही. जोसेफ चेंबरलेन या तेव्हाच्या ब्रिटनच्या वसाहतमंत्र्याने म्हटल्याप्रमाणे, ‘‘The tendency of the time is to throw all power into the hands of the great empires and the minor kingdoms, those which are non progressive seem to fall into a secondary and subordinate place.’’
जर्मनीच्या संदर्भात ॲडमिरल टिरपिट्झने केलेल्या अंदाजाप्रमाणे विल्यम कैसर जर्मनीच्या नौदलाचे सामर्थ्य वाढवत असल्यामुळे ‘‘It would be one of the four world powers : Russia, England, America and Germany’’. मॉनिसिअर या आणखी एका अभ्यासकाच्या इशाऱ्यानुसार फ्रान्सनेही या गटात असायला हवे. कारण ‘‘Those who are not advance, go backwards and who gave back goes under’’.