

T20 World Cup Results :
esakla
किशोर पेटकर
ऑस्ट्रेलिया संघातील बहुतांश खेळाडू अष्टपैलू आहेत, पण मोक्याच्या क्षणी त्यांना संघाचा डोलारा सावरता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध नवव्या षटकात शतकी सलामी मिळूनही ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात जोरदार फलंदाजी केलेल्या अनुभवी स्टीव्ह स्मिथला संघात स्थान मिळाले नाही, ही त्यांच्या निवड समितीची घोडचूकच ठरली.
टी -२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजेतेपदासाठी संभाव्य स्पर्धक मानले जात होते, मात्र या माजी जगज्जेत्या संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. झिंबाब्वेविरुद्धचा त्यांचा पराभव धक्कादायक ठरला. झिंबाब्वेकडून फार अपेक्षा नव्हत्या. आफ्रिकेतील या देशाने केवळ ऑस्ट्रेलियालाच हरविले नाही, तर घरच्या मैदानावर नेहमीच बलाढ्य ठरणाऱ्या यजमान श्रीलंकेलाही पाणी पाजले. ऑस्ट्रेलियाला खूपच लवकर परतीचे तिकीट आरक्षित करावे लागले. मोठा लौकिक असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा मोठा धक्काच मानला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल सहावेळा विश्वविजेतेपद मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाने पाच वर्षांपूर्वी टी-२० जगज्जेतेपदही मिळविले होते. मागील दोन टी-२० विश्वकरंडकांत त्यांना विजेतेपद साध्य झाले नव्हते, तरीही त्यांचे आव्हान ठळकपणे जाणवले होते. यावेळेस २००९नंतर प्रथमच त्यांच्यावर साखळी फेरीत गारद होण्याची नामुष्की आली. साखळी फेरीत झिंबाब्वे व श्रीलंकेकडून हार पत्करल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेबाहेर जाणारा एकमेव मातब्बर संघ ठरला. ही घसरण निश्चितच त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत या नावाजलेल्या संघाचे अस्तित्व जाणवलेच नाही. मैदानावर गोंधळलेला संघ पाहायला मिळाला.