

Baya Weaver Bird Nest
esakal
आपल्या हिरव्यागार फुललेल्या शेतातून निसर्गाचा आणि निसर्गकृतींमधून जीवनाचा, अध्यात्माचा वेध घेणाऱ्या थोर खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरी काटेरी झाडांवर घरटी करणाऱ्या सुगरण पक्ष्याच्या कलेचे, परिश्रमाचे आणि वंशवृद्धीचे कौतुक करताना एका कवितेत म्हणतात,
‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला,
पहा पिल्लांसाठी तिनं, झोका झाडाला टांगला!’
आपली अंडी आणि त्यांमधून बाहेर येणारी पिल्ले यांच्या सुरक्षिततेसाठी आजूबाजूच्या काटक्या, पाने, तंतू, कापूस, गवत यांचा कुशलतेने वापर करून पक्षी विविध प्रकारची घरटी करतात. परंतु यांमध्ये सर्वाधिक कौशल्याने तयार केलेले आणि सुरक्षित म्हणता येईल असे घरटे म्हणजे सुगरण ऊर्फ गवळण ऊर्फ बाया पक्ष्याचे, गारुड्याच्या पुंगीसारखे दिसणारे घरटे. या अप्रतिम कलाकारीनेच या पक्ष्याला या तीनपैकी एक नाव बहाल केले आहे. चांगले घर तयार करणारे या अर्थाच्या मूळ संस्कृतमधील ‘सुगृहकर्ता’ या शब्दाचे संक्षिप्त रूप झाले सुगृही. त्या शब्दावरून गुजराती भाषेत सुगरी आणि मराठी भाषेत सुगृहिणी हे शब्द आले. सुगृहिणीचा अपभ्रंश झाला सुगरिण किंवा सुगरण. या शब्दाचा पाककलानिपुण महिलेबाबतच्या विशेषणाशी काहीही संबंध नाही. या पक्ष्याचे गवळण हे दुसरे नाव मूळ ‘कलाविण’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याचाही गोपिका महिलेशी काहीही संबंध नाही.