रिपोर्ताज। मंगेश कोळपकर
नितांत सुंदर हिमालयाच्या कुशीत, निळ्याशार आकाशाशी स्पर्धा करणारं जगातलं सर्वोच्च शिखर... माउंट एव्हरेस्ट! त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीचा ट्रेक म्हणजे अविस्मरणीय अनुभवयात्रा. ट्रेक सुरू होतो आणि प्रत्येक पावलागणिक उंची वाढते. श्वास खोल जातो. शरीर थकतं. मन मात्र अधिकाधिक शांत, निर्मळ आणि प्रसन्न होत जातं आणि एका क्षणी तिथल्या दगडावर कोरलेलं ‘Everest Base Camp’ दिसतं. डोळे तृप्त होतात, मन भरून येतं. त्या बर्फाच्छादित सौंदर्याची, मन थक्क करणाऱ्या नजाऱ्यांची आणि मनाच्या कोपऱ्याला भिडलेल्या क्षणांची जिवंत झलक असलेला हा रिपोर्ताज...
गुढीपाडव्याची प्रसन्न सकाळ उजाडलेली. दरवर्षीप्रमाणे धाकटा भाऊ मिलिंदचा शुभेच्छा देण्यासाठी अमेरिकेतून फोन आला. गप्पा रंगत असतानाच त्यानं विचारलं, ‘‘दादा, आमच्या एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेकमधून दोघांचा बेत अचानक रद्द झालाय.
तू येशील का?’’ कोणतीच तयारी नसल्यामुळे मी पहिल्याच झटक्यात नकार दिला. पण मिलिंद सहज माघार घेणाऱ्यातला नव्हता. त्याला माझ्या मॅरेथॉन सरावाची कल्पना होती.
नुकत्याच केलेल्या वैद्यकीय चाचण्यांचे ‘ऑल क्लिअर’ रिपोर्ट्स उत्साहात मी त्याला शेअर केले होते. त्यानं त्याचीच आठवण करून दिली. ‘‘सिंहगड दोन वेळा सलग चढ-उतरून दाखवं. हे जमलं तर ईबीसीही जमेल!’’ असा कानमंत्रही त्याने दिला.