कॉन्स्पिरसी फाइल्स । रवि आमले
हिटलरने लक्षावधी ज्यू लोकांची निर्घृण हत्या केली. आता पृथ्वी गोल आहे हे जितके खरे, तितकेच हे विधानही खरे. पण पृथ्वी गोल नसून, सपाट आहे हे मानणारे लोक जसे आज आपल्यात आहेत, त्याचप्रमाणे ज्यू लोकांचे शिरकाण झालेच नाही, असे म्हणणारे इतिहासाचे पुनर्लेखकही आहेत.
बेनेटो मुसोलिनीचे एक स्वप्न होते. त्याला रोमन साम्राज्य उभे करायचे होते. स्वतःला ज्युलियस सिझरच्या रूपात पाहत होता तो. अनेक देशांतील संघटनांचा आजही आदर्श असलेला हा फॅसिस्ट हुकूमशहा, त्याच्याच देशाच्या, इटलीच्या जनतेकडून मारला गेला. पराभव दिसू लागताच तो त्याच्या प्रेयसीसह स्वित्झर्लंडला पळून चालला होता. वाटेत फॅसिझमविरोधी बंडखोरांनी त्याची कार थांबवली. त्याने वेशांतराचा प्रयत्न केला होता. पण सत्ताकाळात जिकडे-तिकडे स्वतःची प्रतिमा मिरवण्याची त्याची हौस आता जीवाशी आली. बंडखोर सैनिकांनी ओळखले त्याला. त्याला पकडून एका खेड्यात नेण्यात आले.
तेथे त्या हुकूमशहाला आणि त्याच्या प्रेयसीला भिंतीजवळ उभे करण्यात आले आणि मशिनगनमधून गोळ्या झाडून त्याचा वध करण्यात आला. ती तारीख होती २८ एप्रिल १९४५. त्यानंतर मिलान शहरातील एका चौकात त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला. त्याच्या अत्याचाराने त्रासलेल्या जनतेचा राग तरीही शांत झालेला नव्हता. लोकांनी विटंबना केली त्याच्या देहाची. लाथा घातल्या, थुंकले, सडक्या भाज्या फेकल्या, शिव्या घातल्या आणि मग मुसोलिनीच्या काळात ज्याप्रमाणे विरोधकांना फासावर लटकावण्यात येत असे, त्याचप्रमाणे त्याच्या मृतदेहालाही भरचौकात उलटे लटकावण्यात आले.