Human Relationship and marriage
Esakal
तन्मय कानिटकर
लोकशाहीत आवश्यक असणारेच गुण आपण लग्न आणि मानवी नातेसंबंधांमध्ये लागू करायचा प्रयत्न केला, तर लग्नातली लोकशाहीही फुलेल. पारदर्शकता, समानता, प्रामाणिकपणा, विश्वास, सन्मान या तर मूलभूत गोष्टी आहेतच; पण त्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाची गोष्टी आजच्या लग्नात अत्यावश्यक आहे ती म्हणजे, चर्चेचं कौशल्य! ते आपल्याला विकसित करावंच लागेल.
वास्तविक या विषयावर लेख लिहायचं पहिल्यांदा मनात आलं, तेव्हा मी स्वतःलाच विचारलं, की उगाच ओढूनताणून दोन अत्यंत भिन्न विषय एकत्र आणून मी खिचडी तर करत नाहीये ना? हे दोन्हीही विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत हे कबूल, पण म्हणून त्यांचा परस्परसंबंध असलाच पाहिजे असं थोडीच? त्यानंतर मग माझ्याच मनातल्या सेन्सॉर बोर्डानं लेखाचा हा विषय बराच काळ अडगळीत टाकला. पण लग्न आणि लोकशाही, दोन्ही विषयच एवढे तगडे, एवढे विचार करायला लावणारे आहेत, की ते फार काळ काही अडगळीत राहू शकले नाहीत. आणि मग जसजसा मी यावर विचार करू लागलो, तसतसं मला जाणवलं, की वरवर पाहता अगदी वेगळ्या भासणाऱ्या या दोन विषयांत अनेक समान धागे आहेत. इतकंच काय, त्या दोन्हीचा एकमेकांवर अतिशय मोठा प्रभाव पडत आला आहे. त्याचाच वेध घेण्याचा हा एक प्रयत्न.
लोकशाही ही तशी आधुनिक राज्यव्यवस्था आहे. प्राचीन भारतातली गणराज्य किंवा ग्रीक शहरांतली रिपब्लिकांची कितीही उदाहरणं लोकशाही म्हणून दिली जात असली, तरी आज ज्या अर्थानं लोकशाही आपण म्हणतो, तशी ती त्या काळी असल्याचे पुरावे नाहीत. असलीच तर ती फारतर ॲरिस्टोक्रसी (Aristocracy) किंवा अभिजन वर्गाची कंपूशाही होती. पण सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार असणारी आधुनिक लोकशाही व्यवस्था ही वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यव्यवस्थांच्या यादीत अगदी अलीकडची व्यवस्था मानावी लागेल. तर याउलट लग्नव्यवस्था! मानवनिर्मित सामाजिक व्यवस्थांपैकी कदाचित सर्वात जुनी असणारी लग्नव्यवस्था! तब्बल दहा-बारा हजार वर्षांचा दांडगा इतिहास या व्यवस्थेला आहे.