डॉ. श्रीनिवास तांबे
घरात बाळ येतं आणि घरातल्यांचं संपूर्ण जगणं नव्या अर्थानं फुलायला लागतं. कोणी आई-बाबा होतं, कोणी आजी-आजोबा... कोणाचे डोळे हर्षाश्रूंनी ओलावतात. बाळाच्या आगमनानं घरातलं प्रत्येक नातं नव्यानं उमगू लागतं. अशा या नव्या वाटचालीत आणखी एक खास नातं हळूच फुलतं ते डॉक्टर आणि पालकांचं.
हे नातं तापमापकात दिसत नाही, रिपोर्टच्या रेषांमध्ये मोजता येत नाही. ते जुळतं विश्वासाच्या शांत स्पंदनांतून, आधारभूत सल्ल्यांतून! आजच्या माहितीच्या उतावळ्या गोंधळात गुगलची फास्ट उत्तरं, व्हॉट्सअॅपचे गैरसमज, यूट्यूबवरचे फुकटचे सल्ले अशा सगळ्या कोलाहलातून बाहेर पडायचं असेल, तर तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, त्या म्हणजे संवाद, संवेदना आणि डॉक्टरांवरचा निखळ विश्वास!