भवताल वेध। सारंग खानापूरकर
आरोग्यसेवेतील विषमता ही एक गंभीर जागतिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. यावर मात करण्यासाठी धोरणात्मक बदल, पुरेशी आर्थिक गुंतवणूक आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारी आरोग्यसेवा आवश्यक आहे. समावेशक आणि न्याय्य आरोग्यसेवेमुळेच खरी ‘आरोग्य समता’ साध्य होऊ शकते.
चांगले आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टींऐवजी इतर वेगाने घडणाऱ्या घडामोडींचीच चर्चा होत असते. त्या अनुषंगानेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणे आखली जातात. पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मुद्द्यांकडे शक्तिशाली देश सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
सत्ता टिकविण्यासाठी शक्तिशाली देशांकडून, गटांकडून केल्या जाणाऱ्या राजकारणाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना, गरीब देशांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असल्याचेही विविध अहवालांतून समोर आले आहे.