

Snow Economy Trends
esakal
अरविंद रेणापूरकर
हिवाळी पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था जगभरात बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नव्या टप्प्यावर उभी आहे. संतुलित धोरणे आणि नवकल्पनांच्या साहाय्याने ती शाश्वत विकासाचे प्रभावी साधन ठरू शकते. अन्यथा बर्फावर उभारलेली अर्थव्यवस्था वितळण्याचा धोका वाढत जाईल.
स्वित्झर्लंड, अमेरिका, चीन यांसारख्या देशांबरोबरच काश्मीरचे हिवाळी पर्यटन नयनरम्य असते. या पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला भक्कम चालना मिळते. यालाच ‘स्नो इकॉनॉमी’ म्हणतात. परंतु २०२६च्या सुरुवातीला जगभरात या अर्थव्यवस्थेची दोन भिन्न चित्रे दिसून आली. एकीकडे चीनसारख्या देशांत झपाट्याने वाढणारा बर्फच्छादित क्रीडा प्रकारांवर आधारित उद्योग, तर दुसरीकडे अमेरिकेचा पश्चिम भाग आणि काश्मीरसारख्या प्रदेशांत घटत्या हिमवर्षावामुळे निर्माण झालेली गंभीर आर्थिक चिंता.