

Sant Namdev Dnyaneshwar Tirthayatra
esakal
संत नामदेव आणि ज्ञानेश्वरादी बांधव यांच्या व्यतिरिक्त आणखी काही संत, विठ्ठलभक्त उत्तरेच्या या प्रवासाला त्यांच्यासोबत गेले असतील का, असाही एक विचार मनात येतो, आणि त्याचे उत्तर काहीसे होकारार्थी असेच हाती येते. मुळात कीर्तन परंपरा काय किंवा वारकरी संप्रदायाच्या, भागवत धर्माच्या बाबतीत घडणाऱ्या अनेक घटनांचा विचार करता, त्यात केवळ एकल अशी व्यक्ती सहभागी आहे आणि ती समाजापासून दूर अशी आपले कार्य करते आहे, असे होऊ शकत नाही.
संत नामदेवांच्या जीवनप्रवासातील तीर्थाटन हा भाग अधिक महत्त्वाचा आहे. या तीर्थाटनामुळे किंवा तीर्थावळीमुळे मराठी संत साहित्यात एक नवा इतिहास रचला गेला. सगुणसाकार भक्तीला नवा आयाम प्राप्त झाला. दोन वाटा एकरूप झाल्या. महाराष्ट्रात भागवत धर्माच्या रुजुवातीचा विचार स्थापित झाला. मुळात दोन वाटा भक्तीच्या निमित्ताने एकत्र आल्या. एकेकटे म्हणून आपल्या कार्यात गुंतून पडलेल्या दोन प्रवाहांना एकत्र येता आले.