book reading
Esakal
अदिती पटवर्धन
वाचनासाठी प्रचंड पर्याय आल्यामुळे आता माझ्याकडे ‘वाचन का होत नाही’, याचं उत्तर द्यायला कारणंच उरली नाहीत! एकेक करत सगळी ‘एक्सक्युझेस’ संपल्यामुळे मी आपसूक पुन्हा वाचनाकडे वळले - या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये पुस्तकं वाचायला लागले!
‘पुस्तकांची खरेदी’ या विषयावर लिहिशील का असं मला विचारलं, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर झळकून गेलं आमचं साधारण ओव्हरफ्लो होणारं पुस्तकांचं कपाट, किंडलवरचा ई-बुक संग्रह आणि या सगळ्यात नव्यानं पडलेली ऑडिओ बुक्सची भर. शिवाय एखादं ऑडिओ बुक फारच आवडलं म्हणून मग ऑर्डर केलेली त्याची छापील प्रत - कारण अर्थातच आवडलेलं पुस्तक छापील स्वरूपात पुन्हा पुन्हा कोणतंही पान उघडून वाचण्यात जी मजा आहे, ती ऑडिओ बुक पुन्हा पुढे-मागे करत ऐकण्यात नाही ना! एकुणात काय, पुस्तक खरेदीच्या बाबतीत मी आणि माझा नवरा जरा घळेच आहोत. दुकानात एखादं पुस्तक इंटरेस्टिंग वाटतंय, घेऊन टाक; आवडत्या लेखकाचं नवीन पुस्तक आलंय, ऑर्डर करून टाक; प्रदर्शनात एखादं अनुवादित पुस्तक सापडलंय आणि एरवी आपल्याला या भाषेतलं काही वाचता येणार नाही म्हणून घेऊन टाक, असं करत करत आतापर्यंत चिक्कार पुस्तकं आम्ही जमवलेली आहेत आणि या संग्रहात भर पडतच राहील याविषयी मला तरी शंका वाटत नाही!