मृणाल तुळपुळे
आज जगभरात कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीमचे असंख्य प्रकार अस्तित्वात आहेत. कॉफी करण्याच्या आणि सर्व्ह करण्याच्या पद्धती मात्र प्रत्येक गावा-देशात वेगवेगळ्या आहेत. त्या कॉफींना नावेही छान छान दिलेली असतात.
उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाचा चटका जाणवू लागला, की आपल्याला थंडगार आइस्क्रीम खायची आणि कोल्ड कॉफी प्यायची इच्छा होते. ह्या दोन्ही पदार्थांमुळे पोटाला थंडावा आणि मनाला तृप्ती मिळते. पण कोल्ड कॉफी आणि आइस्क्रीम हे दोन पदार्थ वेगवेगळे खाण्यापेक्षा ते जर एकत्र केले तर स्वाद आणखी वाढतो, असे मला वाटते.
कॉफीची कडवट चव आणि आइस्क्रीमची गोड चव एकमेकांना बॅलन्स करतात. म्हणूनच की काय, कॉफी व आइस्क्रीम अनेक पद्धतींनी एकत्र केले जाते व प्रत्येक पद्धतीत एक उत्कृष्ट चवीचे व आगळेवेगळे असा पेय वा खाद्यपदार्थ तयार होतो. कॉफीमध्ये आइस्क्रीमचा गोळा घालून केलेला थंड आणि मजेदार कॉफी फ्लोट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.