Gujrati auther Druv Bhatt
Esakal
आरती संतोष करोडे
ध्रुव भट्ट हे गुजराती भाषेतील एक सिद्धहस्त लेखक! अग्निकन्या (१९८८), समुद्रांतिके (१९९३), तत्त्वमसि (१९९८), अतरापी (२००१), कर्णलोक (२००५), अकूपार (२०१०), लव्हली पान हाऊस (२०१२), तिमिरपंथी (२०१५), प्रतिश्रुती (२०१७), न इति... (२०१८), अंतरिक्षना आगिया (२०२२), आजू खेले (२०२३), तिलोर (२०२५) ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके. यातील अनेक पुस्तकांचा मराठीसह हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद झालेला आहे. याशिवाय, शृण्वन्तु (२००१), गाये तेनां गीत (२००३) हे कवितासंग्रहसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. काही पुस्तकांवर आधारित नाट्यकृती आणि चित्रपट आलेले आहेत.
ध्रुव भट्ट यांचा भाषेविषयीचा, विशेषत : बोलीभाषेविषयीचा जिव्हाळा, निसर्गावरील व निसर्गातल्या जीवांवरील प्रेम, मानवी मनाचा साधेपणा, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या सहअस्तित्वाविषयीची तळमळ हे सारे त्यांच्या लेखनातून व्यक्त होते. अशा या प्रतिभावंत लेखकाशी खास साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकानिमित्त मारलेल्या गप्पा...
नमस्कार ध्रुवभाई! तुम्ही आजू खेलेमध्ये लिहिल्याप्रमाणे, तुमच्या शेजारीण बाई तुमच्या लहानपणी तुमच्या भाषेवर टीका करायच्या, पण आज तोच ध्रुव भट्ट गुजरातीला अभिमान वाटेल तसा तारा झाला आहे. इतकंच नव्हे, तर तुमच्या अनेक कादंबऱ्यांचं मराठीतलं भाषांतर शेजारच्या राज्यातले, महाराष्ट्रातले लोक आवडीनं वाचत आहेत. काय प्रतिक्रिया द्याल?
ध्रुव भट्ट ः महाराष्ट्राबद्दल माझ्या विशेष भावना आहेत, कारण माझी आई हरसुता हिचा जन्म महाराष्ट्रातील कोकणपट्टीवरचा. माझे आजोबा श्रीवर्धनच्या नवाबाकडे डॉक्टर होते. त्यावेळेस गुजरातचं जाफराबाद (सौराष्ट्रमधलं शहर) बीदर सिदी नवाबाच्या ताब्यात होतं. तिथं डॉक्टर हवा होता म्हणून माझ्या आजोबांची तिथं बदली झाली. माझ्या आईचा जन्म व प्राथमिक शिक्षण दोन्ही महाराष्ट्रात झालं. आईचं वाचन खूप होतं.
म्हणजे तुमचा महाराष्ट्राशी जवळचा संबंध आहे तर! तुम्ही तुमच्या आईविषयी सांगितलंत. तुमच्या वडिलांची आणि कुटुंबातील इतर सदस्यांचीही ओळख करून द्या.
ध्रुव भट्ट ः माझे बापूजी प्रबोधराय भट्ट कवी होते, त्यांचे दोन कवितासंग्रहही प्रकाशित झाले होते. सुरुवातीला ते रेल्वेत नोकरीला होते, नंतर रेव्हेन्यू खात्यात काम करायचे. त्यावेळेस स्वातंत्र्य नुकतंच मिळालं होतं, त्यामुळे सरकारी नोकरीत सारख्या बदल्या होत असत.
तुम्ही जे सांगताय, त्यावरून वाटतं की तुमचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं असावं...
ध्रुव भट्ट : खरंय! नोकरीमुळे वडिलांची सतत बदली होत असल्यानं माझं अकरावीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत मी अकरा शाळा बदलल्या. त्यामुळे बालपणीचे मित्र किंवा विशेष आवडते शिक्षक असं फारसं काही माझ्या आठवणीत नाही. आणि याचा खरंतर फायदा असा झाला, की मी पुढे फारसं शिक्षण घेतलं नाही. मला पुढे शिक्षण घेण्याची गरजसुद्धा वाटली नाही. अभ्यासाव्यतिरिक्तही मला खूप काही समजलं आणि मजा आली. मला फारशी अडचण आली नाही. मी प्रश्न विचारत विचारत शिकलो.
तसं पाहिलं तर मी पालिताणा, राजुला, जाफराबाद, भेसाण, अहमदाबाद अशा विविध ठिकाणी शिक्षण घेतलं. तिथं मला समृद्ध करणारे अनेक अनुभव मिळत गेले.
वडिलांच्या नोकरीमुळे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहिलात, पण स्थायिक कुठं झालात?
ध्रुव भट्ट : माझं मूळ गाव म्हणता येईल असं गाव नाही. मी अनेक ठिकाणी राहिलो आहे. वडिलांबरोबर भावनगरला आलो. त्याआधी माझ्या आजोबांबरोबर मोरबीला होतो. त्यांच्या आधीची पिढी राजस्थानमध्ये होती. प्रत्येक पिढी गावं बदलत राहिली आहे. माझ्या मुलांचं गाव करमसद. ती तिथं जन्मली, तिथंच वाढली. पण माझं म्हणता येईल असं कोणतंही विशिष्ट गाव नाही.
म्हणजे खरंतर वसुधैव कुटुम्बकम्... पण तरी जन्मगाव भावनगरविषयी काही विशेष ओढ?
ध्रुव भट्ट ः मला भावनगरविषयी ओढ आहे हे खरं. माझं बहुतेक बालपण भावनगरमध्ये गेलं. माझे काका भावनगरमध्ये राहत असत. आम्ही दर दिवाळीत त्यांच्याकडे जात असू. शिवाय इतरही अनेक प्रसंगी तिथं जाणं व्हायचं. आमचे बरेच नातेवाईक भावनगरमध्ये आहेत. म्हणून भावनगर हे आपलं गाव आहे असं सारखं वाटायचं.
शिक्षणानंतर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंत. त्याबद्दल थोडं सांगाल?
ध्रुव भट्ट ः सुरुवातीला अहमदाबादला आयआयएम स्टाफच्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीचं दुकान सांभाळलं, भारतीय विद्याभवनमध्ये सेल्समनही झालो. काही काळ एसटी कॉर्पोरेशनमध्ये क्लार्क होतो. त्यानंतर गुजरात मशिनरी लिमिटेडमध्ये काम केलं. पण लवकरच स्वेच्छानिवृत्ती घेतली.
तुमच्या शाळा बदलत गेल्या, नोकरी मिळाली, लग्नही झालं. या सगळ्यात लिखाणाचं कसं काय सुचलं?
ध्रुव भट्ट ः मी त्यावेळी करमसदमध्ये काम करत होतो. एका संध्याकाळी मी घरी जात असताना, रस्त्यात दोन लहान मुलं भांडताना दिसली. गाव लहान असल्यानं कोणाची मुलं आहेत, हे सहज कळायचं. मी त्यांना अडवलं आणि त्यांना विचारलं, की तुम्ही कशाबद्दल भांडताय? ‘करायला दुसरं काहीच नाही, तर मग अजून काय करू?’ त्यांनी उत्तर दिलं. मी घरी आलो आणि माझ्या बायकोशी, दिव्याशी या विषयावर बोललो.
मुलांकडे करण्यासारखं इतर काहीच नसल्यानं ती भांडतात, हे विचार करण्याजोगं होतं. म्हणून मी मुलांना गोष्टी सांगण्याचा छोटासा उपक्रम सुरू केला. त्यानंतर आम्ही गोष्टींसाठी समुद्रकिनाऱ्यावर तळ ठोकायचो. त्यावेळी आम्हाला आलेल्या अनुभवांमुळे मला वाटलं, की हे तर सर्व जगाला सांगण्यासारखं आहे. अशा प्रदेशांबद्दल, जिथं असे लोक राहतात, जे आपल्यापासून दोनशे-तीनशे किलोमीटर अंतरावर आहेत, त्यांच्याबद्दल सर्वांना सांगितलं पाहिजे. त्या विचारातूनच मी लिहायला सुरुवात केली.
लिहिताना तुम्हाला एका विशिष्ट भाषेत लिहावं असं वाटलं का? तुमच्या प्रत्येक पुस्तकात विशिष्ट भाषा किंवा स्थानिक भाषेचा वापर केला गेला आहे, हे लक्षात घेता हा प्रश्न विचारावासा वाटला.
ध्रुव भट्ट ः स्थानिक किंवा बोलीभाषेचा एक मोठा फायदा आहे. बोलीभाषेत जी शक्ती असते, ती
प्रमाण-लेखी भाषेत नसते. प्रमाण भाषा अभ्यासात शिकवली जाते, स्थानिक भाषा अनुभवातून कळते.
प्रमाण भाषेला बोलीभाषेसारखा हेल नसतो. लहान वाक्यांमध्ये असलेले खोल अर्थ बोलीभाषेत लपलेले असतात, आणि आपण जर ते प्रमाण भाषेत आणले तर ते कृत्रिम वाटतात. मी तुमच्याशी बोलताना जर पुस्तकी प्रमाण भाषेत बोललो, तर तुम्हाला ते ऐकण्यात किंवा माझ्याशी बोलण्यात आनंद होणार नाही. बोलीभाषेत सहजता आणि उत्स्फूर्तता आहे. लहानपणापासून, शाळेत जाण्यापूर्वीच त्या भाषेशी माझी मैत्री झालेली होती. जीवनाचा खोल अर्थ स्थानिक भाषेतच अधिक सापडतो, हे मला लहानपणीच समजलं.
मला वाटतं म्हणूनच तुमचं लेखन लोकप्रिय झालं आहे.
ध्रुव भट्ट ः होय. कदाचित. लोकांना माझं लेखन स्वतःचं वाटलं आहे, आवडलं आहे. मी फक्त एक संदेशवाहक आहे. मी जे ऐकलं आहे, जे पाहिलं आहे, तेच मी लिहिलं आहे. माझं लिखाण लोकप्रिय होण्याचं श्रेय वाचकांना जातं आणि त्यांच्या जिवंत भावनांनाही.
तुम्ही फक्त कादंबऱ्याच लिहिल्या नाहीत, तुम्ही सुंदर कविताही लिहिल्या आहेत. आम्ही बारडोलीतील निरंजनाबेनच्या उत्तर बुनियादी शाळेत गेलो होतो. तुमच्या एका गाण्याबद्दल बोलायचं झालं, तर तिथं शाळकरी मुलींनी ‘खुल्ली मुकी वखार अमे चालतां थया...’ (खुले ठेवून द्वार आम्ही निघून गेलो...) या गाण्यानं आमचं स्वागत केलं. आम्हाला खूप आनंद झाला.
ध्रुव भट्ट ः अरे वाह! असंच केनियातील एका शाळेतून मला फोन आला होता, की आमची मुलं ‘ओचिंतुं कोई मने रस्ते मळे ने पछी धीरेथी...’ (अवचित भेटूनी मला वाटेत हळुच कोणी... मराठी अनुवाद - सुषमा लेले) हे गुजराती गाणं गात आहेत, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. माझ्यासाठी सर्वात मजेची गोष्ट म्हणजे, मला एका बाउल सिंगरचा (बंगाली लोकगायक, विशेषतः सूफीवादी व वैष्णव) फोन आला, ‘‘दादा, आप मुझे आप का लिखा गाना भेज दो, मैं ट्रान्सलेट कर के
गाऊंगा ।’’ आता जेव्हा एखादा बाउल तुम्हाला कोलकात्याहून फोन करून गाणं मागतो, तेव्हा किती आनंद होतो म्हणून सांगू! मराठीतही दोन-तीन गाणी आहेत. ती ध्रुवगीतेमध्ये यूट्यूबवर आहेत.
आजू खेले या पुस्तकात तुमच्या काही गाण्यांचे बारकोड समाविष्ट आहेत. माझ्या माहितीनुसार, हे तुमचे पहिलं पुस्तक आहे, ज्यामध्ये गीतंही आहेत.
ध्रुव भट्ट ः हो बरोबर. कोणत्या प्रसंगी कोणतं गाणं लिहिलं गेलं हे या बारकोडवरून कळेल.
तुमचं पहिलं पुस्तक म्हणजे अग्निकन्या. ते लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
ध्रुव भट्ट ः आम्ही एकदा गीरच्या जंगलामध्ये ट्रेकिंग करत होतो. तिथं जंगलात बाणेज नावाचं एक ठिकाण आहे. आम्ही तिथल्या एका मंदिरात रात्र घालवली. तिथून जवळच बाणगंगा नावाची नदी वाहते. मी तिथल्या साधूला विचारलं, की तिचं नाव बाणगंगा का आहे? त्यानं महाभारतातली कथा सांगितली. द्रौपदीला तहान लागली होती. तिनं अर्जुनला पाणी देण्यास सांगितलं. म्हणून अर्जुनानं बाण मारला आणि दगडातून नदी बाहेर काढली. यावर सर्वांनी अर्जुनाचंच कौतुक केलं. पण माझं म्हणणं असं, की ही अर्जुनाची गोष्टच नाही. जर अर्जुनासारख्या महान योद्ध्याला ज्याठिकाणी बायको पाणी मागते, त्याच ठिकाणी तिच्यासाठी पाणी काढावं लागलं, तर ती स्त्री किती महत्त्वाची असेल? हा गौरव द्रौपदीचा आहे. डोंगरांमध्ये कुठूनही बादलीत पाणी भरता येते. पण द्रौपदीनं मागितल्यावर दगडातून पाणी काढण्यात आलं. द्रौपदीची ही किती महत्त्वाची बाब आहे! हीच प्रेरणा ठरली.
मग तुम्ही समुद्रांतिके (सागरतीरी) लिहिलं. त्यात तुमच्या आयुष्यातील काही घटना असाव्यात असं वाटतं. विशेषतः वैदराज बंधुद्वय राजस्थानहून आले तेव्हाची घटना, नवाबाची कहाणी... या घटना खऱ्या आहेत का?
ध्रुव भट्ट ः मुळात, मी आधी म्हटल्याप्रमाणे, आम्ही समुद्रकिनाऱ्यावरून चालत असायचो. चालताना आम्हाला आलेले अनुभव त्या पुस्तकात आहेत. आपल्या आसपास इतके लोक राहतात... त्यांनी आतिथ्यभावना अजूनही जपल्या आहेत, आजही गेलो तर आपल्याला त्याच स्नेहार्द भावना दिसतात. समुद्रांतिकेमध्ये ती कहाणी सांगितली आहे.
तुमच्या लेखनातून, तुमच्या गोष्टींतून दिसतं, की तुम्ही आयुष्यातील प्रत्येक घटनेत सौंदर्य, लय शोधत आहात; त्यात किती तथ्य आहे?
ध्रुव भट्ट ः मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा आम्ही समुद्रकिनारी गेलो होतो. तेव्हा मी समजून घेण्याचा प्रयत्न केला... या प्रदेशातील लोक इतक्या प्रेमानं का जेवू घालतात? ते पक्ष्याला दाणे घालून मगच स्वतः खातात, असं का? असं काय आहे, जे त्यांना जगापेक्षा वेगळं जगायला प्रेरित करतं? घेड गावातील एका मेर महिलेनं मला याचं खूप छान उत्तर दिलं; ‘आंइ अनंतना घरनी लेरुं आवे पछी तो एम ज होय ने. (इथं अनंताच्या घरची हवा येते, मग तसंच असणार ना!) अनंताच्या घरची हवा... (म्हणजे समुद्राचे वारे) काय सुंदर शब्द सुचले तिला! त्या हवेनंच माझ्या कानात मंत्र फुंकला असेल, ज्यामुळे मला सर्वत्र सौंदर्य शोधण्याची इच्छा झाली असेल. प्रत्येक घटनेत लय पाहण्याची दृष्टी विकसित झाली असेल.
तत्त्वमसि या पुस्तकात नर्मदेच्या, रेवाच्या काठावर राहणाऱ्या आदिवासींची गोष्ट आहे. पण त्या कथेचं बीज जंगलातून आहे. रेवा हा चित्रपटही त्यावर आधारित आहे. चित्रपटाची कथा आणि पुस्तकाच्या कथेत थोडा फरक आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
ध्रुव भट्ट ः नर्मदेच्या काठावर फिरत असताना आम्हाला आलेल्या अनुभवांच्या आधारे ती कादंबरी लिहिली आहे. त्यावेळी आम्हाला भेटलेल्या लोकांबद्दल त्यात लिहिलं आहे. त्यातील साठ टक्के सत्य आहे आणि चाळीस टक्के काल्पनिक कथा आहे. चित्रपटाच्या कथेत बदल आहेत, कारण पुस्तकाच्या लांबीचा चित्रपट करता येत नाही. दुसरं म्हणजे, पुस्तक माझी निर्मिती होती. चित्रपट निर्मात्यांनी मला असंच पुस्तक लिहावं असं सांगितलं नाही. आता चित्रपट ही त्यांची निर्मिती आहे. मी त्यांना काय सांगू की त्यांनी चित्रपट कसा करावा? त्यांनी गरजेनुसार कथा बदलली आहे.
इतर कुठल्या कादंबरीवर आधारित चित्रपट-नाटक तयार होत आहे का? माझ्या माहितीनुसार अकूपारचं नाटकरूप आलं आहे.
ध्रुव भट्ट ः हो, अकूपारवर आधारित एक नाटक तयार केलेलं आहे. अतरापीवरही एक नाटक लिहिलेलं आहे, पण ते अद्याप तयार झालेलं नाही. तिमिरपंथीचंही एक नाटक लिहिलं गेलं आहे. बुधन थिएटर ते सादर करणार होते, पण ते अद्याप झालेलं नाही. तिमिरपंथीवर आधारित एक चित्रपटदेखील तयार होत आहे. त्यानंतर आता फक्त आठ प्रकरणांची शेवटची कादंबरी अष्टपदी येईल, ज्यावर आधारित एक चित्रपट केला जात आहे. हा चित्रपट करणारी चार-पाच तरुणांची एक टीम आहे. त्यांनी मला चित्रपटाचा विषय सांगून त्यावर कथा लिहायला सांगितली. मी म्हणालो, की मी हे कधीही केलेलं नाही, पण बघू या करून. म्हणून मिळालेल्या विषयावर चित्रपटासाठी एक कादंबरी लिहिली. आता त्यावर चित्रपट होईल.
अष्टपदीआधी तुम्ही तिलोर लिहिलंत. त्यात एका पक्ष्याची काही गोष्ट आहे. तुम्हाला त्याचं कथानक कसं सुचलं?
ध्रुव भट्ट ः कच्छमध्ये तिलोर म्हणजेच घोराड पक्ष्याच्या आता फक्त दोन माद्या शिल्लक आहेत. त्या किती टिकतील याची निश्चिती नाही. खूप कठीण आहे त्यांचं अस्तित्व टिकवणं. त्यांच्यासाठी नर आयात करायचा आहे. पण अजून काहीही झालेलं नाही. जर या माद्यांचा नराशी समागम होण्याआधीच मृत्यू झाला, तर तिलोर नष्ट होईल. एक संपूर्ण प्रजाती नामशेष होईल. त्या पक्ष्याचं नामशेष होणं आणि त्याप्रकारच्या मानवाचं नामशेष होणं, या दोन्ही गोष्टी तिलोरमध्ये समांतरपणे जातात. हे पुस्तकही सध्या मराठीत अनुवादित केलं जात आहे.
आपल्या तिमिरपंथी या कादंबरीत नावाप्रमाणे काही निशाचर जमातींची कथा आहे. ही कथा कुठून आली? तुम्ही त्या कादंबरीत त्या लोकांची बोलीभाषा बेमालूमपणे घेतली आहे.
ध्रुव भट्ट ः मी निशिकुटुंब ही बंगाली कादंबरी वाचली होती आणि त्यात अशी कथा होती. मग मला असं वाटलं, की असे लोक गुजरातमध्येही असतील. मी चौकशी केली आणि अशा काही लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललोही. दिव्या आणि मी त्यांच्यासोबत जायचो, त्यांच्यासोबत बसायचो, त्यांची बोलीभाषा समजून घ्यायचो, त्यांचं संभाषण समजून घ्यायचो. त्याआधारे त्यांची बोलीभाषा पुस्तकात घेतली आहे.
अकूपारमध्ये तुम्ही गीर आणि आजूबाजूच्या गावांची गोष्ट घेतली आहे. मला वाटतं तुम्ही त्यात ‘आईमा’बद्दल लिहिलंय, ती एक खूप प्रसिद्ध कलाकार आहे.
ध्रुव भट्ट ः नाही, तिथल्या लोकांच्या सामान्य समजातून एका महिलेचं काल्पनिक पात्र तयार केलं आहे. गीरच्या चारणांमध्ये (भाटसारखी एक जमात) ‘आईमा’ म्हणतात, त्या वृद्ध महिलांचा त्या पात्राशी थेट संबंध नाही. हो, मी उभं केलेलं पात्र चित्रकार आहे एवढंच.
अतरापीमध्ये माणसांऐवजी तुम्ही कुत्र्यांची पात्रं घेतली आहेत. त्याविषयी काय सांगाल?
ध्रुव भट्ट ः बरोबर, अतरापी ही कादंबरी एका कुत्र्याबद्दलची कथा आहे. घरातून एक पिल्लू बाहेर येतं. राजवाड्याजवळील दारातून दुसरा मोठा कुत्रा म्हणतो, ‘तू इथे का आलास? जा, तुझ्या इलाख्यात/प्रांतात राहा.’ पिल्लू विचारतं, ‘इलाखा’ म्हणजे काय?’ मग मोठा कुत्रा म्हणतो, ‘या दाराच्या आत ये म्हणजे मी तुला इलाखा म्हणजे काय ते सांगेन.’ तर पिल्लू म्हणतं, ‘मला इलाखा म्हणजे काय हे कळलं आहे. तुम्ही ज्या जागेला सोडून बाहेर जाण्यास सुरक्षित नाही त्याला इलाखा म्हणतात.’ थोडक्यात काय, तर अतरापी ही कादंबरी समाजाच्या स्वीकृत मान्यता तोडते. उदाहरणार्थ, आपण इलाख्याला गौरवशाली मानतो, परंतु प्रत्यक्षात तो भीतीची निर्मिती आहे.
कर्णलोक ही तुमची आगळ्या दुनियेची, एका अनाथाश्रमावरची कादंबरी आहे. तुम्हाला ही कथा कुठं सापडली?
ध्रुव भट्ट ः ती कथा लिहिण्यासाठी मी काही दिवस एका अनाथाश्रमात राहिलो. अनाथाश्रमात वाढलेल्या एका महिलेशीही बोललो. अनाथाश्रमात मुले कशी राहतात, त्यांची दिनचर्या, त्यांचा समजूतदारपणा इत्यादी गोष्टी मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. अशारितीनं हा कर्णलोक कादंबरीच्या रूपानं अवतरला.
लव्हली पान हाऊसमध्ये रेल्वेच्या डब्यात सापडलेला मुलगा पान हाऊसमध्ये काम करतो, मोठा होऊन चित्रपट जगात नाव कमावतो. पण कथेचा केंद्रबिंदू पान हाऊस आहे...
ध्रुव भट्ट ः लव्हली पान हाऊस भावनगरबद्दल आहे. खरेतर मी माझी गाडी दुरुस्त करण्यासाठी ज्या गॅरेजमध्ये जात असे, तिथं मला या गोष्टी सापडल्या. आणि पात्रं विविध अनुभवांमधून उदयाला आली आहे.
न इति व अंतरिक्षना आगिया या कादंबऱ्या या खगोलशास्त्रावर आधारित आहेत काय?
ध्रुव भट्ट ः न इति ही विज्ञानकथा आहे. आपण दुसऱ्या ग्रहावरून राहायला आलो आहोत, अशाप्रकारे ही कथा मांडली आहे. आपण वारंवार म्हणतो, की ते असं होतं - ते तसं होतं. जर ते असं होतं, तर ते सर्व कुठं आहे? आणि जर ते असं होतं, तर ते दुसऱ्या ग्रहावर कुठेतरी होतं. जेव्हा मनुष्य या ग्रहावर आला, तेव्हा त्याला जे काही आठवतं ते तो होतं असं म्हणत असतो, पण त्याचा कुठंही पुरावा नाही. तर ही कथा अशा प्रकारे मांडली आहे. अंतरिक्षना आगिया कादंबरीमधील पौराणिक कथा धार्मिक नसून शैक्षणिक कथा आहेत, असं सांगण्याचा प्रयत्न आहे. नक्षत्र-ताऱ्यांशी असलेलं त्यांचं नातं धार्मिक नसून शैक्षणिक आहे असं म्हणायचं आहे.
तुमच्या प्रत्येक कादंबरीत कमीत कमी एक तरी बळकट स्त्रीपात्र असतं. असं का? तुमच्या आयुष्यात तुम्हाला अशी कोणती स्त्री भेटली आहे का?
ध्रुव भट्ट ः आम्ही लहानपणी भजन ऐकायचो. त्यात महिलांचं भजन असायचं, पुरुषांचं भजन असायचं. पुरुषांनी लिहिलेल्या भजनांमध्ये शिकवण असायची - हे करा, हे करू नका याच गोष्टी असायच्या. देवाला भजण्याविषयी जे काही असायचं, ती शिकवणच असायची. पण महिलांनी लिहिलेल्या भजनांमध्ये, विशेषतः गंगासतीच्या भजनांमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्याची चर्चा येत असे. तोरल/तोळांदे (जेसल-तोरल हे गुजरातमध्ये कच्छी संत जोडपं होतं, तोरल ही त्यापैकीच) म्हणते की मी तुझी नाव बुडू देणार नाही. पण कोणत्याही पुरुषानं कधीही असं म्हटलं नाही की मी तुम्हाला वाचवीन. ही महिलांची ताकद आहे. पुरुषांच्या भजनांमध्ये ती कधीच आली नाही.
तुम्ही बालसाहित्यही लिहिलं आहे. गाय तेनां गीत हा बालगीतांचा संग्रहही प्रकाशित झाला आहे...
ध्रुव भट्ट ः बालसाहित्यात माझं फार मोठं योगदान नाही. तथापि, खोवायेलुं नगर (हरवलेले शहर) ही किशोरकथा मी लिहिली आहे. पण आता ती उपलब्ध नाही. गाय तेनां गीत हा कवितांचा संग्रह आहे, त्यात मुलांसाठीच्या कविता आहेत. बाकी विशेष काही लिहिलेलं नाही. पण मी मुलांसाठी उपक्रम घेतो. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ते सुरू केले. त्याशिवाय शृण्वन्तु हा अल्बमही केला होता. ध्रुवगीत हादेखील त्याच पद्धतीनं केलेला कवितांचा संग्रह आहे. तो नीला टेलिफिल्म्सनी (तारक मेहता का उल्टा चष्मा फेम) यांनी यूट्यूबवर अपलोड केला आहे.
तुम्ही गाणीही रचली आहेत. तुमच्या कवितांमध्ये एक जिवंतपणा आहे. गाण्यांना गेयता आहे. ती तात्त्विकदेखील आहेत. तुम्हाला कविता सुचतात कशा?
ध्रुव भट्ट ः कवितेचं असं आहे, की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाला भिडते, तेव्हा ती गाण्याच्या स्वरूपात बाहेर येते. काहीतरी आत खोलवर फुटतं, नंतर ते लिहिलं जातं. काही वेळा तुम्हाला काही चांगल्या ओळी लगेच सापडतात, तर काही वेळा खोलवर शोधावं लागतं. काही वेळा आसपास असं काही घडतं, की लगेच गाणं लिहिलं जातं.
मी तुम्हाला एक छान घटना सांगतो. धरमपूरजवळील एका डोंगरावर पिंडवळ नावाचं एक गाव आहे. दिव्या आणि मी तिथल्या एका आदिवासी शाळेत काम करत होतो. आम्ही मुलांना शिकवत होतो. ती मुलं खूप लाजाळू होती. त्यांची भाषा कुंकणा. आम्ही त्यांना गुजराती शिकवत होतो, पण मुलं बोलत नव्हती. म्हणून मी एक नियम केला - मुलं प्रार्थनेसाठी उभी राहतील, तेव्हा प्रत्येकजण एक पात्र होईल - कोणी वाघ होईल, कोणी वांगं होईल आणि दुसऱ्या दिवशी प्रार्थनेनंतर स्वतःचा अनुभव सांगतील. शेवटी माझी पाळी आल्यावर मी मुलांना विचारलं, मी काय होऊ? ती म्हणाली, ‘‘दादा, तुम्ही ढग व्हा,’’ आणि मी ढग झालो, ‘चालने वादळ थईए’ (चला ढग होऊ या) ही कविता रचली गेली -
चालने वादळ थईए अने जोईए के क्यांक थाय छे धोधमधोध जेवुं कांई आपणा विषे..
आपणामां कोई हळ जोडे के कोई बे जणा जाय भींजाता, खेतरो भणी जाय भींजाता वावणी विषे.. चालने...
(चला ढग होऊ आणि पाहू या की कुठेतरी धबधब्यांसारखे काही घडते का आपल्यामुळे...
आपल्यामुळे कुणी नांगर जोते, कुणी दोघं जातात भिजत, शेतांकडे जातात भिजत पेरणीसाठी...)
ध्रुव भट्ट यांना मिळालेले साहित्यिक पुरस्कार
१. तत्त्वमसि कादंबरीसाठी २००२चा राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार आणि १९९८-९९चा उमा-स्नेहरश्मि पुरस्कार
२. दर्शक फाउंडेशन पुरस्कार २००५
३. गाय तेनां गीत यासाठी गुजराती साहित्य परिषद पुरस्कार
४. समुद्रांतिके कांदबरीसाठी गुजरात साहित्य अकादमी आणि गुजराती साहित्य परिषद पुरस्कार
५. अतरापीसाठी गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार
६. कर्णलोकसाठी गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार
तुम्ही आणखी बालसाहित्य का लिहिलं नाही? उलट तुम्ही प्रवास- कॅम्पिंग- पर्यटन यावर भर देता. ते का?
ध्रुव भट्ट ः मला बालसाहित्यात उपदेशकथा लिहिणं आवडत नाही. त्याऐवजी मला मुलांना थेट काही उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणं, त्यांना समुद्रावर घेऊन जाणं, त्यांना स्वातंत्र्य देणं हे आवडतं. म्हणूनच मी त्यांना असे उपक्रम करायला लावतो. शालेय शिक्षण आवश्यक आहे, परंतु प्रवासात, कॅम्प्समध्ये म्हणजेच शिबिरांमध्ये मूल जे शिकतं ते कधीही विसरत नाही. माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यात जीवन घडतं. खेळांद्वारे सर्वांगीण विकास साध्य करता येतो. जर त्यांना ते स्वतः करायला आवडलं, जर त्यांना ते अनुभव घेऊ दिले, तर ते अधिक नैसर्गिकरित्या आत्मसात करू शकतात.
लेखन आणि मुलांच्या उपक्रमांव्यतिरिक्त तुमच्या इतर छंदांबद्दल सांगा.
ध्रुव भट्ट ः माझा छंद म्हणजे लोकांसोबत बसणं, बोलणं, अनोळखी लोकांच्या घरी राहणं. जे अनुभव आले त्यांच्याबद्दल लिहिणं. मला खूप उत्सुकता असते. आधी सांगितलंच, की मी प्रश्न विचारून शिकलो आहे. भाषेशी माझी मैत्री लहानपणापासूनच आहे. प्रमाण भाषेपेक्षा मला बोलीभाषेनं जास्त शिकवलं आहे.
तुमची अष्टपदी कादंबरी पूर्ण झाली आहे. आता पुढे काय? तुम्ही आता काय करत आहात? एखादा ट्रेकिंग कार्यक्रम किंवा एखादं शिबिर?
ध्रुव भट्ट ः आमचा एक ‘वसुंधरानी वाणी’ नावाचा वार्षिक कार्यक्रम आहे. जेव्हा लोकांमध्ये द्वेष वाढला, तेव्हा मी ठरवलं की मी हे सर्व शांत करण्यासाठी आणि प्रत्येकाच्या मनात खरी समज जागृत करण्यासाठी काहीतरी करेन. म्हणून दरवर्षी आम्ही चार दिवस लोकांच्या घरी राहतो आणि कबीरांचे दोहे वगैरे गातो. देशभरातून १५०-२०० लोक येतात. तिथं हॉटेलं नाहीत. आणि असली तरी आम्ही हॉटेलमध्ये राहत नाही. आम्ही पूर्णपणे दुर्गम भागात असतो.
तुमच्या पत्नीला या सगळ्यात किती रस आहे? ती तुमची प्रेरणामूर्ती आहे का?
ध्रुव भट्ट ः होय. तिच्याशिवाय हे सर्व शक्य झालं नसतं. ती मुलांसोबत कॅम्पमध्ये यायची. तिला हे सर्व आवडतं. ती आमच्यासोबत ट्रेकिंगमध्ये सगळीकडे असायची. पिंडवळलाही ती माझ्यासोबत राहायला आली होती आणि आमची मुलं करमसदमध्ये होती.
मी तुम्हाला एक मजेदार घटना सांगतो. आम्ही मुलांना समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाऊ लागलो, त्यावेळी फी फक्त २५ रुपये होती. नाव दिलं आणि मूल आलंच नाही असं होऊ नये यासाठी फी. यामध्ये त्यांना येथून घेऊन जाणं, सहा दिवस समुद्रकिनाऱ्यावर राहणं, जेवू घालणं आणि त्यांना परत आणणं असं सर्व समाविष्ट होतं. एकदा एक जोडपं त्यांच्या मुलीला सोडायला आलं. त्या गृहस्थाच्या पत्नीनं दिव्याला विचारलं, ‘माझ्या मुलीचे केस लांब आहेत, तुम्ही तिची वेणी घालून द्याल का?’ दिव्या म्हणाली, ‘हो. कॅम्पमधील सर्व मुलींच्या वेण्या मीच घालते.’ त्यावर त्या बाईंचा नवरा म्हणाला, ‘का नाही घालणार? पंचवीस रुपये कशाचे घेतात मग?’ दिव्या एकही शब्द बोलली नाही. मला वाटलं होतं दिव्या म्हणेल, ‘मला कॅम्पला यायचं नाही.’ पण ती काहीच बोलली नाही. ती फक्त थोडी हसली.
तुमची पत्नी, मुलांविषयी थोडं सांगा.
ध्रुव भट्ट ः दिव्या भावनगरचे गझल लेखक जटिल व्यास यांची मुलगी. आमचं लग्न १९७२मध्ये झालं. मला दोन मुलं; मुलगा देवव्रत आणि मुलगी शिवानी. सुनेचं नावही शिवानी आहे. मुलगा आणि सून दोघंही आपापल्या व्यवसायात आहेत. शिवानी शिक्षिका आहे.
तुम्ही एके ठिकाणी लिहिलं आहे, की तुम्हाला लहानपणी भाराडी आणि खेपानी अशी विशेषणं मिळाली. तुम्ही लहानपणी खोडकर होतात का?
ध्रुव भट्ट ः मी माझ्यापेक्षा वडील असणाऱ्या लोकांशीही वाद घालत असे. प्रश्न विचारत असे. मी घराच्या छतावर किंवा झाडावर बसायचो. थोडक्यात, मी मस्तीखोर असल्यानं मला भाराडी आणि खेपानी म्हणत असत.
तुम्ही समुद्रांतिकेत जलतत्त्व, तत्त्वमसित आकाशतत्त्व, अकूपारमध्ये पृथ्वीतत्त्व, अग्निकन्यात अग्नितत्त्व अशा पाच घटकांपैकी कोणत्यातरी एका घटकाला प्राधान्य दिलं आहे. मग वायुतत्त्वाचं काय? तुम्ही त्यावर कादंबरी लिहिण्याची योजना आखत आहात का?
ध्रुव भट्ट ः नाही! मी घटकांबद्दल विचार करून कोणतीही कादंबरी लिहिलेली नाही. उद्या आपण काय करणार याचे कोणतंही नियोजन केलेलं नाही. मी माझ्या मनाप्रमाणे लिहितो. मुळात मी नियोजन करत नाही. वर्तमानात जे काही घडत आहे, त्याचा मला आनंद आहे. भविष्याची काळजी नाही.
आमच्या वाचकांना तुम्ही काय सांगाल?
ध्रुव भट्ट ः अरे... मराठी वाचकांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल नतमस्तक होण्याशिवाय माझ्याकडे शब्द नाहीत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला संदेश येतात. पत्रं येतात. मला आश्चर्य वाटतं, की दुसऱ्या भाषेतील पुस्तकाचं भाषांतर वाचणं, मूळ पुस्तक कोणी लिहिलं आहे हे शोधणं आणि लेखकाला फोन करणं किंवा पत्र लिहिणं हे एक असं काम आहे ज्यासाठी खूप ताकद लागते. मराठी वाचकांनी ते धाडस दाखवलं आहे.
मला अंजनीताई नरवणे, सुषमाबेन शाळिग्राम यांसारखे चांगले अनुवादकदेखील मिळाले आहेत. आता आजू खेलेसुद्धा मराठीत प्रकाशित होणार आहे.
(आरती संतोष करोडे अहमदाबादस्थित अनुवादक व लेखक असून त्यांची गुजराती, हिंदी व इंग्रजीत मिळून आतापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.