

Himalayan ecosystem degradation
esakal
डॉ. गुरूदास नूलकर
आपल्या वसुंधरेवरील जीवनाचा समतोल येथे असलेल्या विविध परिसंस्था सांभाळत असतात. जंगल परिसंस्था साधारणपणे परिचित असते, मात्र त्याव्यतिरिक्त अन्य परिसंस्थाही पृथ्वीचा समतोल सांभाळत असतात. प्रत्येक परिसंस्थेची रचना, तेथील हवामान आणि जैवविविधता वेगळी असते. हवामान बदलामुळे या परिसंस्थांवरील ताण दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याशिवाय मानवी हस्तक्षेप, हरितगृह वायूंचे उत्सर्जन, प्रदूषण यांमुळे या परिसंस्थांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. हवामान बदलाचे विविध परिसंस्थांवर होणारे परिणाम समजून घेऊ या...
हिमालयातील सरासरी तापमानात जागतिक सरासरीपेक्षा वेगाने वाढ झाल्याने हिमनद्या वितळताहेत. सुरुवातीला नद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढते; पण दीर्घकाळात हिमनद्या कमी झाल्यावर पाण्याची टंचाई निर्माण होते. भविष्यात याचा परिणाम पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत जाणवू शकतो. येथे वास्तव्य असलेल्या कोट्यवधी लोकांच्या पाणीसुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. शास्त्रज्ञांच्या मते या प्रदेशात तापमानवाढ अशीच सुरू राहिली तर इथला मोठा हिमसाठा सुमारे २१००पर्यंत नष्ट होऊ शकतो. या तीव्र उताराच्या प्रदेशात अचानक आलेला मोठा पाऊस धोकादायक ठरतो. बदलत्या पावसाने भूस्खलन, पूर, शेतीचे आणि गावांचे नुकसान, पाणी व्यवस्थेवर ताण आणि मानवी जीवितहानी हे सर्व धोके स्पष्ट दिसून येतात.
हिंदुकुश-हिमालय प्रदेशात तापमानवाढीमुळे अनेक वनस्पती व प्राणी उंच भागांकडे स्थलांतर करत आहेत; काही प्रजातींना मात्र जुळवून घेणे शक्य नसल्याने त्या नामशेष होण्याचा धोका वाढत आहे. हजारो वर्षे हिमालयाला आपले घर मानून वसलेल्या समुदायांचे जीवन इथल्या नैसर्गिक साधनांवर अवलंबूनच चालते. हवामान बदलामुळे काही संसाधने मिळेनाशी झाली आहेत, तर नवीन संसाधने शहरातून स्वस्त भावात येऊ लागली आहेत.