

Religious Society of Friends
esakal
डॉ. सदानंद मोरे
गांधींच्या कार्याचे महत्त्व पुरस्कारांवर अवलंबून नाही आणि विशेष म्हणजे कोणताही क्वेकर पंथीय ते अमान्य करणार नाही हे निश्चित. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरत्रही अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यलढे उभारले हे वेगळे सांगायची गरज नाही. लंडनमधील पार्लमेंट चौकात गांधींचा पुतळा १४ मार्च २०१५ या दिवशी तेव्हाचे प्रधानमंत्री डेव्हिड कॅमरून यांच्या हस्ते बसवण्यात आला. हा गांधींचा दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत येण्याच्या शताब्दीचा काळ होय.
जगातील राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्ष संपुष्टात आणून शांततेची प्रस्थापना करावी आणि त्यासाठी काहीएक यंत्रणा उभी करावी, या हेतूने प्रेरित होऊन विचार आणि कृती करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची चर्चा करणे विश्वाचे आर्तसाठी निश्चितच अगत्याचे आहे. याच संदर्भात आपण क्वेकर पंथ आणि विल्यम पेन यांची चर्चा सुरू केली होती. क्वेकर संप्रदाय किंवा समाजमित्र - ‘Religious Society of Friends’ या धार्मिक पंथाची स्थापना जॉर्ज फॉक्सने केली असली, तरी शांतीसाठी वैश्विक, किमानपक्षी युरोपीय यंत्रणेची मांडणी तपशिलाने कोणी केली असेल तर अर्थातच पेनने. त्यामुळे या चर्चेत पेनला महत्त्वाचे स्थान द्यावे लागणार यात शंका नाही. अर्थात, चर्चा पेनपुरती मर्यादित न राहता पंथाची तात्त्विक भूमिका, या भूमिकेतून उद्भवणारी शृंगापत्ती व पडणाऱ्या मर्यादा इत्यादी मुद्द्यांचाही परामर्श घ्यावा लागणार आहे.