डॉ. विनय गोऱ्हे
घरात एखादा पाळीव प्राणी असणे हा एक सुखकर अनुभव असला, तरी तो निव्वळ मजेचा भाग नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारीही आहे. अनेकदा या जबाबदारीची जाणीव लोकांना नसते, त्यामुळे पाळीव प्राणी असणे त्रासदायकदेखील होऊ शकते. यासाठी प्राणी पाळण्याआधी काही गोष्टींचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ मी पशुवैद्यक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मला प्राण्यांची आवड अगदी लहानपणापासून. म्हणूनच मी या क्षेत्राकडे वळालो. त्यामुळे मला नेहमीच माझ्या आवडीचे काम करायला मिळाले. प्राण्यांसोबत काम करणे अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. विशेषतः पाळीव प्राणी आपल्याला ज्याप्रकारे प्रतिसाद देतात, तो अनुभव सुखकर असतो.
ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांना आधी ‘पेट ओनर’ म्हटले जायचे. अलीकडच्या काळात मात्र ‘पेट पॅरेंट’ किंवा ‘पेट सिबलिंग’ म्हटले जाते. म्हणजे पाळीव प्राण्याला आपले मूल किंवा भावंडच मानले जाते. फोनवरही बोलताना ‘माझा कुत्रा’ किंवा ‘मा
झी मांजर’ असे न म्हणता, ‘मी ‘कोको’ची आई बोलते आहे,’ असे अगदी सहज सांगितले जाते. थोडक्यात काय, तर पाळीव प्राणी आता केवळ सोबती न राहता कुटुंबाचे सदस्यच झाले आहेत.