
प्रज्ञा राजोपाध्ये
जंगलात भटकत असताना एक वेगळीच घटना दिसली. एक बिबट्या जात होता. त्याच्या साधारण चारपाचशे फुटांवर एक हरिण उभे होते. आम्हाला वाटले आता तो धावत जाऊन हरणाची शिकार करणार!
पण तो बिबट्या हळूहळू सावधपणे चालत, अंदाज घेऊन रस्ता ओलांडून निघून गेला. आम्हाला आश्चर्य वाटले! तेव्हा समजले, की जंगली जनावरे भूक लागली तरच शिकार करतात.
आम्ही यावर्षी १४ दिवसांची केनिया, झिंबाब्वे व दक्षिण आफ्रिकेची टूर केली. त्यापैकी केनियामधील मसाई मारा या जंगलाची सफर अद्भुत होती.
आमच्या सहलीची सुरुवात मुंबईहून झाली. साधारण सहा तासांचा विमानप्रवास करून आम्ही नैरोबीला पोहोचलो. विमानतळाबाहेर आमच्याकरता सहा आसनी सफारी गाड्या उभ्या होत्या. त्यात बसून आम्ही मसाई माराच्या दिशेने निघालो.