डॉ. प्रमोद जोग
वाढ म्हणजे शरीराचा आकार, पेशींची संख्या, वजन-उंची यांची संख्यात्मक वाढ. पण बरेचसे चिंतातुर पालक याच आकड्यांमध्ये गुरफटून राहतात. मुलांचा विकास ही सतत पुढे जाणारी गोष्ट आहे. बाळ मातेच्या उदरामध्ये असतानाच बाळाचा विकास सुरू झालेला असतो आणि जन्मानंतर पहिल्या काही वर्षांमध्ये वाढ आणि विकास वेगानं होतो.
मुलगे आणि मुली या काही स्त्री-पुरुषांच्या नुसत्या लहान प्रतिकृती नसतात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये असतात. त्याची माहिती पालकांना असेल, तर मुलांचं डोळसपणे संगोपन करता येतं. मुलांची शारीरिक वाढ आनुवंशिकता, आहार, शारीरिक आजार आणि संप्रेरकं यांवर अवलंबून असते.