Street Shopping
Esakal
श्रुती कुलकर्णी
स्ट्रीट शॉपिंगमुळे फॅशनविश्वाची कवाडं आता सर्वांसाठीच खुली झाली आहेत. तरुणाईला आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणि ट्रेंडी फॅशन फॉलो करण्यासाठी मॉल्स किंवा महागड्या ब्रँड्सची गरज पडत नाही. तुम्हीही स्ट्रीट शॉपिंगचा आनंद घ्या आणि ट्रेंडी राहा!
आजकालच्या तरुणाईमध्ये स्ट्रीट शॉपिंगची एक वेगळीच क्रेझ आहे. मॉल्समधली चकचकीत दुकानं आणि ब्रँडेड वस्तूंपेक्षा रस्त्यांच्या कडेला फुटपाथवर असलेली छोटी छोटी दुकानं, स्टॉल्स आणि तिथं मिळणाऱ्या हटके वस्तू तरुणाईला जास्त आकर्षित करत आहेत. स्ट्रीट शॉपिंग म्हणजे केवळ खरेदी नाही, तर तो एक वेगळाच भन्नाट अनुभव असतो. ‘आओ जाओ, देखो भालो, पसंद आए तो ले डालो!’ या तत्त्वावर स्ट्रीट शॉपिंग चालतं. कपडे, वस्तूंच्या किमतीत घासाघीस करणं, नवनवीन गोष्टी, फॅशन शोधणं आणि आपल्या थोड्याशा बजेटमध्येही मनासारख्या वस्तू मिळाल्याचा आनंद हे सगळं स्ट्रीट शॉपिंगमध्ये दडलेलं आहे. इथं कपड्यांपासून ते फूटवेअर्सपर्यंत, दागिन्यांपासून ते घर सजावटीच्या वस्तूपर्यंत आणि गॅजेट्सपासून खाद्यपदार्थ व ॲँटिक वस्तूंपर्यंत सगळं काही मिळतं. इथं तुम्हाला ब्रँडेड वस्तूंची अपेक्षा नसते, पण बजेटमध्ये स्टायलिश आणि हटके गोष्टी नक्कीच मिळतात.