

Mugdha and the Mango Story
esakal
अश्विनी जांभेकर-पितळे
आंबा खाण्याचा सोहळाच होणार होता आता! मुग्धाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तिनं आईला कात्री आणून दिली. आईनं खोक्याची दोरी कापली आणि आंब्याचं खोकं उघडलं, घरात आंब्याचा सुगंध दरवळला. मुग्धा अगदी कुतूहलानं बघत होती. सुरुवातीला तिला आंबा काही दिसला नाही. ‘‘आई आंबे कुठे आहेत?’’ मुग्धानं विचारलं. ‘‘आहेत ना खाली!’’ असं म्हणून आईनं खोक्यातलं गवत बाजूला केलं. त्या गवतामधून पाच-सहा पिवळी डोकी दिसायला लागली.
आनंद मामा आला तेव्हा मुग्धा खेळण्यांच्या पसाऱ्यात बसली होती. मामा आलेला पाहून मुग्धाला उत्साह आला.
‘‘ए मामा, माझ्याशी खेळ ना थोडावेळ. आईला कधीच वेळ नसतो. सारखं स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असते. मला कंटाळा येतो. बाबापण घरी उशिरा येतो आणि त्याला खेळायचं म्हटलं की ‘मी थकलोय’ म्हणतो.’’
आई सगळं ऐकत असते. ती म्हणते, ‘‘मुग्धा, आता तू लहान आहेस का? खेळावं गं एकटं. कोणीतरी सतत कशाला हवंय तुला सोबत? रेवाकडे जातेस का खाली? मामा सोडून येईल.’’
‘‘नको गं, रेवा सारखी भांडते माझ्याशी.’’
‘‘पण मी आहे ना! मी खेळतो तुझ्याशी,’’ आनंद म्हणाला.
‘‘खरंच?’’ मुग्धानं उडीच मारली.
‘‘हो नक्की. आपण पझल्स खेळू चित्रांची, चालेल?’’
‘‘हो चालेल!’’
‘‘पण आधी ही सगळी पसरवलेली खेळणी आवरून ठेवू या आपण.’’
मुग्धा भराभर कामाला लागली. खेळणी, भांडी, बाहुलीचं घर, बाहुल्या, ठोकळे, क्ले, साचे, प्राणी सगळं पटापट त्यांच्या जागेवर गेलं.
‘‘काय गं मुग्धा, यातला जिराफ कुठं दिसत नाहीये, कुठं गेला?’’
‘‘अरे तो ना मी खिडकीत उभी होते तेव्हा खाली वर्तक काकूंच्या छज्ज्यावर पडला.’’
‘‘अगं एवढा मोठा जिराफ छज्ज्यावर कसा पडेल?’’
‘‘मामा त्रास देऊ नकोस हं! तो खेळण्यातला खोटा आणि छोटासा जिराफ आहे.’’
‘‘अच्छा, म्हणजे तू त्रास दिलास त्याला म्हणून त्यानं उडी मारली!’’
‘‘ए नाही रे. माझ्या हातातून पडला तो...’’
‘‘ओऽऽऽ, म्हणजे तू ढकललंस त्याला!’’
‘‘नाऽऽऽही, तो खोटा आहे.’’
‘‘अच्छा म्हणजे जिराफ खोटं बोलतोय का?’’
‘‘मामा मी मारेन हं तुला आता!’’ मुग्धा चिडली.
‘‘बरं बरं चल, आधी आपण तुझा जिराफ काढू मग खेळू.’’