

Marathi Children Stories on Summer
esakal
अस्मिता पोकळे
उन्हाळा आला, की मनात सर्वप्रथम येतो तो फळांचा राजा ‘आंबा’! आंब्याचा सुगंध, गोडवा आणि त्याची चव प्रत्येकाच्या मनात खास जागा निर्माण करते. महाराष्ट्रात आंब्याला केवळ फळ नाही, तर परंपरा व आठवणींचा खजिना मानले जाते. कोकणातील रसाळ हापूस असो किंवा घरगुती कच्च्या कैरीपासून तयार होणारे पदार्थ असोत, प्रत्येक प्रकारात आंब्याची एक वेगळीच जादू दडलेली असते. त्यातही हापूसची चव देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे.
आंबा केक साहित्य
एक कप हापूस आंब्याचा रस, १ कप बारीक रवा, अर्धा कप साखर (आवडीनुसार), अर्धा कप तेल, अर्धा कप दूध, १ चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, सजावटीसाठी केशर, पिस्ता व बदामाचे बारीक तुकडे, अर्ध्या आंब्याच्या पातळ फोडी.
कृती
आंब्याचा रस आणि साखर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी. आंब्याचा गोडवा चाखून साखर घालावी. या मिश्रणात बारीक रवा आणि तेल घालून नीट मिक्स करावे. मिश्रण वीस मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर मिश्रणात दूध, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिक्स करावे. केकच्या भांड्याला तेल लावून मिश्रण त्यात ओतावे. मग हा केक प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसवर ४० मिनिटे बेक करावा. केक थंड झाल्यानंतर आंब्याच्या चार ते पाच पातळ फोडी कापाव्यात व केकच्या वर लावाव्यात. वरून केशर, पिस्ता व बदामाचे काप घालावेत. केक कापून सर्व्ह करावा.
टीप
केक अधिक मऊ होण्यासाठी थोडे कंडेन्स्ड मिल्क घालावे. ओव्हन नसेल तर कढईतही हा केक करता येतो.