scientist C.V.Raman
scientist C.V.Raman Esakal

नोबेल सन्मान मिळविणारे आशिया खंडातील पहिले शास्त्रज्ञ ज्याच्या नावे सुरु आहे ही संशोधन संस्था

पीएच.डी. आणि त्यानंतरही संशोधन करण्यासाठी इथे संशोधकांना संधी मिळू शकते. याखेरीज वैज्ञानिक अधिकारी म्हणूनही अनेक संशोधन प्रकल्पांवर कार्य करण्याची संधी इथे उपलब्ध

विज्ञानतीर्थ : सुधीर फाकटकर

पारदर्शक माध्यमातून प्रकाश जाताना त्याच्यात होणाऱ्या विखुरण्याच्या क्रियेचे विज्ञान विशद करणाऱ्या सर सी.व्ही. रामन यांच्या संशोधनास १९३०मध्ये नोबेल सन्मान मिळाला. सर रामन हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीयच नव्हे, तर आशिया खंडातीलही पहिले शास्त्रज्ञ होते.

हा सन्मान मिळवल्यानंतर सर रामन यांनी तत्कालीन म्हैसूर संस्थानाकडे स्वतंत्र संशोधन संस्था उभारण्यासाठी प्रस्ताव मांडल्यावर त्यांना बंगळूर येथे दहा एकर जमीन देण्यात दिली.

याच ठिकाणी सर रामन यांनी १९४८मध्ये स्वतःच्या निधीतून संशोधन संस्था उभारली. त्यांच्या निधनानंतर १९७२मध्ये या संस्थेची पुनर्रचना होऊन ही संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत आली.

आरंभी भौतिकशास्त्रात मूलभूत संशोधन करण्याचा उद्देश असलेल्या या संस्थेने आता आपल्या संशोधनाच्या विषयांची व्याप्ती वाढवत भौतिकशास्त्राशी संबंधित आधुनिक विषयांनाही महत्त्वदिले आहे.

संस्थेचे पदार्थ आणि प्रकाश भौतिकी, संघनित पदार्थ (कन्डेन्स्ड मॅटर), सैद्धांतिक भौतिकी आणि खगोलशास्त्र व खगोलभौतिकी असे चार विभाग आहेत.

पदार्थ आणि प्रकाश भौतिकी विभागात आण्विक-रेण्वीय तसेच प्लाझ्मा (अतिउच्च तापमानातील पदार्थाची चौथी अवस्था) पातळीवरील संशोधन केले जाते. संघनित पदार्थ विभाग द्रव ते घन अवस्थेतील पदार्थांसंदर्भात अतिशीत अवस्थेत होणाऱ्या भौतिक बदलांच्या अनुषंगाने संशोधन करत असतो.

यामध्ये चुंबकीय तसेच अतिसंवाहकता अशा गुणधर्मांचा शोध घेतला जातो. सैद्धांतिक भौतिकी विभागात भौतिक विज्ञानाचा अभिजात, पुंजकीय तसेच सांख्यिकीय विषयांच्या दृष्टिकोनातून अभ्यास होतो.

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी विभागात खगोलशास्त्राचा आधुनिक (दृश्य तसेच अवरक्त, रेडिओ, क्ष-किरण वर्णपटांच्या माध्यमातून निरीक्षण केले जाणारे खगोलशास्त्र) शाखांच्या माध्यमातून अभ्यास केला जातो.

या सर्व विभागांना विविध उपकरण सुविधा पुरवण्यासाठी यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान-संगणक अशा तीन खास उपविभागांची जोड देण्यात आलेली आहे.

इथली ग्रंथालय सुविधा विशेष वाखाणण्याजोगी आहे. मूलभूत विज्ञानातील हजारोंच्या संख्येतील मुद्रित तसेच डिजिटल माध्यमातील पुस्तके व अहवाल इथे उपलब्ध आहेत. देशातील मान्यवर संशोधन संस्थाच्या ग्रंथालयांना हे ग्रंथालय जोडले गेलेले आहे.

श्राव्यातीत ध्वनींच्या वापरातून काचेच्या उपकरणांचे संरक्षण, रेडिओ संकेत वहनासाठी अवकाशीय अडथळ्यांवर मात करणारी प्रणाली, सूक्ष्मादीसूक्ष्म पातळीवर रेणूंचा मागोवा घेणारे साधन, कर्करोगाच्या पेशी शोधणारी संवेदक प्रणाली असे विविध क्षेत्रांसाठी शंभरपेक्षाही जास्त प्रकारचे मूलभूत संशोधन या संस्थेने साध्य केले आहे.

या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. संकेतस्थळावर विस्तृतपणे देण्यात आलेली माहिती चाळल्यास मूलभूत संशोधनाचा आवाका आणि आवश्यकता लक्षात तर येतेच शिवाय पायाभूत संशोधनाचे महत्त्वही कळते.

मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण संशोधन करण्यासाठी इथे अनेक संधी उपलब्ध असतात. मूलभूत तसेच आंतरविषय विज्ञान शाखांच्या तसेच अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षण सुरू असलेल्या तसेच पदवी-पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध विभागात संशोधक साहाय्यकापासून कार्यक्षेत्राच्या संधी उपलब्ध असतात.

पीएच.डी. आणि त्यानंतरही संशोधन करण्यासाठी इथे संशोधकांना संधी मिळू शकते. याखेरीज वैज्ञानिक अधिकारी म्हणूनही अनेक संशोधन प्रकल्पांवर कार्य करण्याची संधी इथे उपलब्ध असते.

रामन संशोधन संस्था

सी.व्ही. रामन अॅव्हेन्यू,

सदाशिवनगर बंगळूर 560080

संकेतस्थळः https://www.rri.res.in

--------------------

scientist C.V.Raman
National Science Day : सी.व्ही. रामन यांना पडलेला 'तो' प्रश्न त्यांना नोबेलपर्यंत घेऊन गेला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com