

Relational dynamics in youth
esakal
मधू (मृण्मयी) शिरगांवकर
लहानपणी लेवाडी वाटणारी अपर्णा आणि ही लीलया सर्वांना खेळात हरवणारी अपर्णा यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. एकेकाळी वयात जाणवणारा खूप मोठा फरक आता जाणवेनासा झाला होता. पुस्तकांची देवाणघेवाण, कवितांवर चर्चा, मित्रमैत्रिणींच्या बाबतीतले किस्से ती रसाळपणे सांगे. पण गप्पा कंटाळवाण्या नसत. रविवार छान जायला लागला होता माझा...
अपर्णाच्या आणि माझ्या नात्याला नाव काय द्यायचं, हा प्रश्न माझ्या मनात आजही अनुत्तरीत आहे. अपर्णा, माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी आणि आता माझ्या मित्राची बायको. त्यांचं लग्न माझ्यामुळेच ठरलं आणि झालं. तसं तिला लहानपणापासून ओळखत होतो. बाबांचा हा शाळेतला मित्र, दर सुट्टीत सगळं कुटुंब घेऊन गावी येत असे. तिचा मोठा भाऊ सुमित, माझ्याच वयाचा, त्यामुळे अर्थातच सुट्टी लागली की आमच्या उंडारक्या सुरू होत असत. अपर्णाला आमच्याबरोबर खेळायला घ्यायला सगळ्या मोठ्या भावंडांसारखा सुमितही नाराज असे.
काका म्हणत असत, ‘‘घ्या रे तिलाही, ती एकटी काय करेल घरात बसून?’’ मग नाइलाजास्तव हे लटांबर आमच्याबरोबर न्यावं लागे. निदान तेव्हा तरी आम्हाला असंच वाटायचं. नाही म्हटलं तरी आमच्या खोड्यांना आळा बसायचा. उंच झाडावर चढावं तर, ‘दादा मला नाही येत चढता,’ असं म्हणून अपर्णा रडू लागायची आणि वैतागून आम्हीही खाली उतरायचो. आमच्यासारखी वेगानं ती पळूही शकत नसे. मग सुमितची खूप चिडचिड व्हायची. शिवाय हिच्यामुळे बाकी सगळे मित्र आपल्याला खेळायला बोलवणारच नाहीत अशी भीती त्याला वाटत असावी.