
डॉ. श्रीरंग गायकवाड
dnyanabatukaram@gmail.com
आपण सतत अस्वस्थ आहोत. निरनिराळ्या चिंता मनाला कुरतडत आहेत. संसाराची, नोकरी-धंद्याची, गरिबी-श्रीमंतीची, वर्तमानाची-भविष्याची शेकडो टेन्शन घेऊन जगतो आहोत. काही तरी बिनसलं आहे, हरवलं आहे, अशी भावना सतत मनात आहे. या सगळ्यांवरचे उपाय आपल्याजवळच आहेत. जे आपल्याला संतांनी सांगितले आहेत.
सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है
शायर-गीतकार शहरयार यांची ‘गमन’ या १९७८मधील सिनेमातील ही गझल. अहोरात्र धावणाऱ्या मुंबई शहरात स्वत:मध्ये हरवलेला, खुरटी दाढी वागवत चिंतेत बुडालेला, गर्दीतही एकटा असा हिरो फारूख शेख दिसतो.
धावणारं शहर हे आपल्या भौतिक प्रगतीचं प्रतीक आणि त्यात हरवलेला फारूख हा त्या शहरातील प्रत्येक माणसाचं प्रातिनिधिक चित्रच. जसजसा माणूस आधुनिकतेकडे, प्रगतीकडे निघाला आहे, तसतसा तो या गाण्याप्रमाणं, त्यातील हिरोप्रमाणं आतून ‘परेशान’, अस्वस्थ होत आहे.