कॉन्स्पिरसी फाइल्स । रवि आमले
मॉर्गन यांनी एक अत्यंत धाडसी, म्हणाल तर वेडी अशी योजना आखली. तिघांची हत्या करण्याची. त्यानुसार त्यांनी त्या तिघांना टायटॅनिकच्या पहिल्या प्रवासाचे खास आमंत्रण पाठवले आणि मग ठरल्यानुसार टायटॅनिक बोट एका हिमनगावर आपटवून बुडवण्यात आली. या तिघांची हत्या करून ती लपवण्यासाठी त्यांच्यासोबत सुमारे दीड हजार लोकांची हत्या करण्यात आली. केवढे हे क्रौर्य! केवढी ही सनसनाटी कहाणी!
मोठी सुरस आणि चमत्कारिक कहाणी आहे ही. एखाद्या ‘थ्रिलर’पटात शोभावी अशी. त्या कथेस प्रारंभ होतो १९१०च्या नोव्हेंबरमध्ये.
बर्फाळ थंडीच्या त्या महिन्यातील असाच एक दिवस. खरेतर रात्र. अंधारलेली, धुरक्याने माखलेली. त्या रात्री न्यू जर्सी रेल्वे स्थानक अगदी विराण भासत होते. नाही म्हणायला, फारशा वापरात नसलेल्या एका फलाटावर एक रेल्वेगाडी लागलेली होती. तिला एक खासगी, आलिशान डबा जोडलेला होता. त्या डब्याच्या खिडक्यांवर पडदे ओढलेले होते. आत कोण आहे हे बाहेरच्या कोणा भोचक डोळ्यांना दिसू नये याची नीट काळजी घेतलेली होती.
रात्रीच्या अंधारात एकेक करीत सहा व्यक्ती त्या डब्यात शिरल्या. गुपचूप. सर्वांच्या नजरा चुकवत. पण समजा चुकून कोणी पाहिलेच असते, तर वाटले असते, की कोणी धनदांडगे बदकांची शिकार करायला चालले आहेत. तसा समज व्हावा यासाठी त्यातील एकाने सोबत शॉटगनही घेतली होती.