

Traditional Diwali Ladoo Recipes
esakal
सुप्रिया खासनीस
दिवाळी म्हटलं, की फराळाच्या ताटात मानाचा लाडू हवाच. लाडूशिवाय फराळ अपूर्णच. या लाडवानं लग्नातली रुखवतं, मुंजीतली रुखवतं, सण-समारंभ यांमध्ये मानाचं अढळ स्थान राखलेलं आहे. फराळाच्या ताटात काजू बेदाणे लावलेला ‘स्मायली’ लाडू दिसला म्हणजे ताट पूर्ण झालं! अशा या लाडवाच्या काही पारंपरिक व इतर पाककृती...
वाढप
१५-२० लाडू
साहित्य
दोन वाट्या बारीक रवा, १ वाटी पाणी, २ वाट्या साखर, अर्धी वाटी तूप, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे.
कृती
प्रथम रवा मंद आचेवर तुपावर चांगला भाजून घ्यावा. मग त्याचा खमंग वास आला की खाली उतरवून घ्यावा. आता साखरेमध्ये पाणी घालून त्याचा एकतारी पाक करून घ्यावा. त्यानंतर भाजलेला रवा त्यामध्ये घालावा आणि ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे, वेलची पूड घालून मिश्रण एकसारखे करून घ्यावे. शेवटी तासाभराने लाडू वळायला घ्यावेत.
वाढप
२५-३० लाडू
साहित्य
चार वाट्या रवाळ बेसन पीठ, तीन-साडेतीन वाट्या पिठीसाखर, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे, पाव वाटी दूध, २ वाट्या तूप.
कृती
एका कढईत तूप घालून त्यावर हरभरा डाळीचे पीठ बदामी रंगावर भाजून घ्यावे. बदामी रंग आल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडावे म्हणजे बेसन फुलून येते. बेसन चांगले फुलले, की ते ते व्यवस्थित भाजले गेले आहे समजावे. मग मिश्रण कोमटसर झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळून एकसारखे करून घ्यावे. आता वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे, बेदाणे घालावेत व मिश्रण थोडे मळावे. मळल्यामुळे लाडू घट्ट न होता छान मऊ होतात. याचप्रमाणे मुगाच्या डाळीच्या पीठाचे लाडूदेखील करता येतात.