

Traditional Godhadi Art
esakal
सोनिया उपासनी
आज बहुरंगी पॅचवर्क कला फॅशनमध्ये परतली असली, तरी त्याची मुळे आपल्या ग्रामीण परंपरेत खोलवर रुजलेली आहेत. पारंपरिक गोधडी कलेला आधुनिक बाजारपेठेत नवी ओळख मिळणे आनंदाची बाब आहे. गोधडी केवळ जुन्या कपड्यांचे थर शिवून तयार केलेली वस्तू नाही, तर ती स्मृती, श्रम, कल्पकता, बचत आणि पर्यावरणप्रेम यांना जोडणारी कलाकृती आहे.
भारतीय संस्कृतीत जुन्या वस्तूंना नवे रूप देण्याची परंपरा फार जुनी आहे. पूर्वी एखादा कपडा फाटला किंवा जुना झाला, की तो लगेच टाकून न देता त्याचा पुनर्वापर केला जात असे. त्यातून गोधडी, पिशव्या, चटया, आसने अशा अनेक उपयोगी वस्तू तयार केल्या जात असत. आजच्या काळात याच कल्पनेला रिसायकलिंग, अपसायकलिंग आणि सस्टेनेबल फॅशन अशी आधुनिक नावे मिळाली आहेत. विशेषतः जुन्या, वापरलेल्या कपड्यांपासून हाताने शिवलेली बहुरंगी गोधडी केवळ उपयोगाची वस्तू नसून, भारतीय ग्रामीण जीवन, कौशल्य आणि सर्जनशीलतेचे सुंदर प्रतीक आहे.
गोधडीच्या या पारंपरिक कलेला आता पॅचवर्कच्या आधुनिक फॅशनने नवे रूप दिले आहे. गोधडी विणण्याची प्रक्रिया अत्यंत साधी दिसत असली, तरी त्यामागे मोठे श्रम आणि कौशल्य असते. गोधडी शिवण्यासाठी सर्वप्रथम घरातील जुन्या साड्या, शर्ट् स, कुर्ते, चादरी, ब्लाउजेस, पायजमे व इतर कपडे गोळा केले जातात. त्या कपड्यांचे वापरण्यायोग्य भाग वेगळे करून त्यांचे चौकोनी, आयताकृती किंवा वेगवेगळ्या आकारांचे तुकडे केले जातात. हे तुकडे रंग, पोत आणि आकार यांनुसार एकमेकांवर रचले जातात व त्यांचा थर तयार केला जातो. मग हाताने बारीक टाक्यांनी ते शिवले जातात. काही गोधड्यांमध्ये दोन ते तीन थर असतात, तर काही जाड गोधड्या विणण्यासाठी अधिक थर वापरले जातात.