

Sensory experience of hot crispy jalebi
esakal
विशेष सणांना विशेष गोड पदार्थ असले, तरी तोवर संशोधकांनी साखरेला अगदी क्षुद्र गटात मोडले नव्हते. त्यामुळे आया, आज्या शुगर फ्रीच्या मागे धावत नव्हत्या. उलट आम्हाला पोळीचा लाडू, गूळ तूप पोळी, मुरांबा/मेथांबा/साखरांबा रोज दुपारी गिल्ट-फ्री खायला मिळत असे. लग्नकार्यात जिलेब्या, गुलाबजामांचे दर्शन व्हायचे. पिवळ्या, केशरी चकचकीत जिलेब्यांचे ढीग असलेली ताटं पंगतीत बागडत असत.
लहान असताना भूगोल हा माझा बऱ्यापैकी नावडता विषय होता. डिझर्टमध्ये मिळणाऱ्या पदार्थांना डिझर्ट म्हणत असावेत अशी माझी एक गोड(!?) समजूत होती. जिथे प्यायला पाणी नाही तिथं कसलं आलंय चांगलं गोडधोड? त्यामुळे गोबी वाळवंटात फार फार तर गोडाचा गोबी पराठा देत असावेत या भीतीयुक्त शंकेने माझी सगळ्याच गोड पदार्थांबद्दल इच्छा त्या डिझर्ट्ससारखी डेझर्टेड होऊ लागली. खरंतर तेव्हा वय, वजन आणि शरीराची चयापचय क्रिया माझ्या बाजूने होती. पण मेंदूचा ताबा तोवर साखरेनं घेतला नव्हता. त्यामुळे समोर रसरशीत जिलेब्या, गुबगुबीत पुरणपोळ्या, पाकात लोळलेले गुलाबजाम किंवा साखरेत घोळलेले कंदी पेढे जरी आले, तरी त्यांना मोहमायेशिवाय नाही म्हणणे मला सहज शक्य होते. मात्र वाढत्या वयाबरोबर साखर कणाकणाने, दाण्यादाण्याने मेंदूवर मोहिनी घालू लागली. ‘डिझर्ट्स कॅनॉट बी डिझर्टेड’ ही भावना नकळत इतर अब्जावधी लोकांसारखी माझ्यादेखील मनात रुजू लागली. आणि मग एकेक करून पेढे ते पुडिंग, मिल्कशेक ते मोदक, केक ते कलाकंद अशा सगळ्या डिझर्ट्सनी जिभेचा, पोटाचा आणि मनाचा ताबा घेतला.