डॉ. केतन गोखले
पृथ्वीवरचा स्वर्ग असे यथार्थ वर्णन असलेल्या काश्मीरपर्यंत रेल्वेमार्ग असावा, सर्व ठिकाणांहून काश्मीर जोडले जावे, हे स्वप्न भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून पाहिले गेले. सुरुवातीला भौगोलिक आव्हानांमुळे आणि नंतरच्या भू-राजकीय संकटांमध्ये हा लोहमार्ग अडकला.
स्वातंत्र्यानंतर सात दशकांमध्ये देशाने केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे सुरक्षितता, हवामान बदल आणि पर्यावरणीय ऱ्हास यांच्या कसोटीवर पुरेपूर उतरलेला काश्मीर रेल्वे प्रकल्प अभिमानाने उभा राहतो आहे. काश्मिरी नागरिकांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास येते आहे.
काश्मीरला जायचं ठरवल्यावर पुढचा प्रश्न आपोआप येतो, की कसे जायचे? एकतर थेट विमानाने श्रीनगरमध्ये उतरायचे. दिल्ली, पुणे-मुंबई अशा प्रमुख शहरांमधून श्रीनगरसाठी नियमित विमानसेवा आहे. दुसरा मार्ग म्हणजे रस्ता.
जम्मूपासून श्रीनगर सुमारे तिनशे किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू-श्रीनगर या आठ ते दहा तासांच्या प्रवासात आपल्याला निसर्गाची विविध रूपे जवळून न्याहाळता येतात. तिसरा म्हणजे लोहमार्ग. या तिसऱ्या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि वेगाने सुरू आहे. जम्मूपर्यंत रेल्वेचा प्रवास सहजतेने करता येतो. मात्र काश्मीर खोऱ्याला जोडणारे रेल्वेमार्ग नव्हते.
श्रीनगरला देशातील वेगवेगळ्या शहरांशी रेल्वेने कसे आणि कधी जोडता येईल, यावर केंद्रीय पातळीवर सातत्याने चर्चा होत असे. कारण, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी (आताच्या) पाकिस्तानातील रावळपिंडीहून जम्मूपर्यंत रेल्वे आणली होती. १९४७मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान विभाजनात तो रेल्वेमार्ग तुटला. त्यामुळे जम्मूपर्यंत जाण्यासाठी पठाणकोट हेच शेवटचे रेल्वे स्थानक ठरले.
जम्मूच्या पुढे काश्मीर खोऱ्यात पोहोचण्यासाठी रस्त्यानेच प्रवास करावा लागत होता. दरम्यान १९६५मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धाने जम्मू भागातील रेल्वेमार्गाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यानंतर पठाणकोटच्या पुढे जम्मूपर्यंत रेल्वेमार्ग विकसित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. जम्मू रेल्वे स्थानक उरलेल्या भारताशी जोडेपर्यंत १९७१साल उजाडले होते.