

Trirashmi Caves
esakal
या लेणीसमूहाकडे पाहताना लक्षात येतं, की नाशिकची त्रिरश्मी लेणी ही केवळ दगडात कोरलेली वास्तुशिल्पं नाहीत, तर ती एका दीर्घ काळाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय प्रवासाची साक्ष आहेत. सातवाहन, क्षत्रप, आभीर राजांची सत्ता, व्यापाऱ्यांची देणगी, बौद्ध धर्मातील वैचारिक बदल, हीनयान ते महायानचा प्रवास आणि नंतर जैन प्रभाव या सगळ्यांच्या छटा इथं एकाच वेळी दिसून येतात.
नाशिक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावरचं एक अत्यंत महत्त्वाचं शहर. इतिहास, श्रद्धा आणि मानवी वस्तीची परंपरा इथं सलग एकत्र गुंफलेली दिसते. गोदावरीच्या तीरावर वसलेलं हे नगर केवळ तीर्थक्षेत्र म्हणूनच नव्हे, तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या मानवी जीवनाचा साक्षीदार म्हणूनही ओळखलं जातं. या भूमीचा इतिहास थेट अश्मयुगापर्यंत मागे जातो, हे इथं सापडलेल्या दगडी हत्यारांमधून स्पष्ट होतं. काळाच्या ओघात नाशिक व्यापारी मार्गांवरचं महत्त्वाचं केंद्र झालं आणि दख्खनच्या राजकीय-सांस्कृतिक घडामोडींमध्ये त्याची भूमिका अधिक ठळक होत गेली.