

Finding happiness in present moments
esakal
प्रणव बापट
डोह खोल असतो. त्याच्यावर अनेक तरंग उमटतात, पण आतून तो खूप खोल आणि शांत असतो. इतर भावना त्या तरंगांसारख्या असतात; त्यांच्या मुळाशी आनंद असतो, शांतता असते, समाधान असतं ही जाणीव किंवा ही खात्री आपल्याला असली, की तरंगांचा फारसा परिणाम आपल्या मनावर होऊ शकत नाही. राग, चिंता, भय, संताप, दुःख, नैराश्य यांच्या छायेत न आलेला आनंद सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ असेल.
काही दिवसांपूर्वी मित्र-मैत्रिणींच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही एक उपक्रम सुरू केला होता. रोज संध्याकाळी त्या दिवसात घडलेल्या अशा एका गोष्टीबद्दल अगदी थोडक्यात ग्रुपवर लिहायचं, ज्यामुळे आपल्याला अतिशय आनंद झाला असेल, समाधानी वाटलं असेल. फार चर्चा, प्रतिक्रिया, स्पष्टीकरण न देता फक्त असा एक क्षण, अशी एक आठवण शब्दबद्ध करायची, जेव्हा आपण त्या संपूर्ण दिवसात मनापासून आनंदी, सकारात्मक, समाधानी होतो. मग आम्ही रोज एकेका गोष्टीबद्दल लिहू लागलो. कधी आपापलं वैयक्तिक यश, कधी पाहिलेले सुंदर चित्रपट किंवा वेब सीरिज, केलेल्या छोट्या-मोठ्या खरेद्या, भेटलेली माणसं आणि त्यातून झालेला आनंद, कधी कोणाला मिळालेल्या अतिशय सुंदर कॉम्प्लिमेंट्स, कधी बरेच दिवस राहून गेलेल्या पण मग त्या एका दिवशी आपण शांतपणे केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी... असं बरंच काही आम्ही लिहीत गेलो. एकमेकांचा हा सुखसंवाद आम्ही वाचत गेलो आणि मग लक्षात आलं, की आनंद ही एक भावना सर्वसाधारणपणे अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांतून, काहीवेळा तर चक्क एखाद्या वेगळ्याच भावनेचं अस्तर लावून आपल्या वाट्याला येते आणि म्हणूनच ती दुर्लक्षित केली जाते. काहीवेळा त्या माध्यमाची किंवा त्या दुसऱ्या भावनेची छाया इतकी गडद असते, की कदाचित त्या भावनेच्या मुळाशी असलेला आनंदही आपल्याला दिसूनच येत नाही.