विश्वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे
ट्रम्पला हवी असलेली America First जगातील सर्व सामर्थ्यशाली राष्ट्र होईलही. त्यासाठी राष्ट्राध्यक्षांच्या मनात तिच्या हितसंबंधांना प्राधान्य देण्याचा विचार असेलही. मात्र त्यातून निष्पन्न होईल ते ‘अमेरिका प्रथम’ असे नसून ‘अमेरिका एकमेव’ असेल. प्रथम असण्यासाठी कोणीतरी दुसरा तिसरा असावा लागतो. असा कोणी ट्रम्पच्या हिशेबात आढळत नाही. हे धोरण America Firstऐवजी America Onlyच्या वळणावर जायची शंका भेडसावते.
हेन्री किसिंजरच्या भर सत्तासमतोलाच्या माध्यमातून विश्वव्यवस्था (World Order) निर्माण करण्याच्या व सांभाळण्यावर होता. याचा अर्थ अमेरिकेच्या हिताकडे वा हितसंबंधाकडे दुर्लक्ष करायचे असा नव्हता. उलट ही व्यवस्था अमेरिकेच्या हिताचीच असणार अशी त्याची खात्री होती. तिच्या अमेरिकेला थोडीफार झळ पोहोचली, तरी ती तिने सहन करायला हवी असे त्यातून आपोआप निष्पन्न होते.
अर्थात तरीही झळ किंवा नुकसान व्यवस्थेच्या अभावी किंवा अन्य प्रकारच्या व्यवस्थेत जास्त प्रमाणात सहन करावे लागेल असेच त्याच्या सिद्धांतात गृहीत आहे. म्हणजेच एकीकडे अमेरिकेचे हितसंबंध व दुसरीकडे जगाचे म्हणजे जगातील इतर राष्ट्रांचे संबंध यांच्यात संघर्ष होऊ देता दोघांचेही हित अशा प्रकारच्या व्यवस्थेने साधता येईल. अशा व्यवस्थेची निर्मिती व रक्षण हे महासत्तांचेच (Super Power) काम आहे. आणि ही महाशक्ती आपणच असायला व राहायला हवे, अशा पद्धतीनेच अमेरिकेचे राजकारण केले पाहिजे.