आरोग्य। डॉ. प्रणिता अशोक
पाणी म्हणजे जीवन असे उगाचच म्हटलेले नाही. शरीरातील दोन तृतीयांश भाग पाणी किंवा द्रव पदार्थांनी तयार झालेला आहे. शरीराची जीवनरेखा म्हटल्या जाणाऱ्या रक्तामध्ये एकूण ८३ टक्के पाण्याचा समावेश असतो. जर पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले तर शरीरातील टाकाऊ पदार्थ साचून त्वचा कोरडी होणे, अपचन, बद्धकोष्ठता, डोकेदुखी असे त्रास सहन करावे लागतात.
डोळे, तोंड, पचनसंस्था, सांधे अशा अवयवांना पाण्याचा पुरेसा पुरवठा आवश्यक असतो. पाण्याच्या अभावामुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. पचनासाठी तोंडातील लाळ साह्य करते. कोरड्या तोंडामुळे चर्वण तसेच जेवण गिळण्यास त्रास होतो. परिणामी अपचन, अॅसिडीटी होण्याची शक्यता वाढते. आपल्या डोळ्यांनाही डोळ्यातील धूळ तसेच मळ काढण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे डोळे ओलसर तसेच चमकदार दिसतात.
कॅल्शिअम व ड जीवनसत्त्व यांच्या बरोबरीने पाणी आपली हाडे मजबूत तसेच आरोग्यदायी ठेवण्याचे काम करते. दोन हाडे किंवा सांध्यामध्ये असलेल्या वंगणरूपी द्रावाचा मोठा भाग पाण्याचा असतो. दोन हाडांमध्ये असलेल्या या स्नायूबंधाचे काम नीट चालण्यासाठी त्यांना नियमित पाणी मिळणे आवश्यक आहे.