

Best Potting Mix for Terrace Garden
esakal
डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी
झाडावर मावा पडला आहे, कोणतं औषध मारू? या प्रश्नाखालोखाल सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, कुंडीत कशा प्रकारची माती वापरू? माती कुठून मागवू? किंवा लाल गाळयुक्त माती उत्तम असते का? याबाबतचं मार्गदर्शन नेहमी मागितलं जातं. बहुसंख्य लोक मातीची तजवीज कशी करतात? काहीजण नदीकाठची लाल माती ट्रॉली भरून मागवतात. काहीजण ई-कॉमर्स वेबसाइट किंवा ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरून माती मागवतात. काही वेळा अंगणातील माती उकरून ती कुंडीत भरली जाते किंवा रस्त्याकडेला असलेल्या मोकळ्या मैदानातली माती गोळा करून भरली जाते. यातला कोणता पर्याय उत्तम? खरंतर यातील कोणताच पर्याय उत्तम नाही. नदीकाठची किंवा इतर कुठलीतरी माती आणून कुंडीत घालून गच्चीवर ठेवणं ना पर्यावरणाच्या दृष्टीनं बरोबर आहे, ना गच्चीवर वाढणाऱ्या अतिरिक्त भाराच्या दृष्टीनं.
नदीपात्रातील माती काढल्यामुळे मातीची धूप वाढते आणि नैसर्गिक समतोल बिघडतो. या उत्खननामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर, वनस्पतींच्या आरोग्यावर, नदीपात्रातील समृद्ध जैवविविधतेवर आणि संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.