

Varicose Veins Symptoms
esakal
डॉ. सुबोध देशमुख
अनेक रुग्ण पायात वेदना होत आहेत म्हणून व्हेरिकोज व्हेन्स असलेल्या भागात जोरात मालिश करतात किंवा अत्यंत गरम पाण्याने शेकतात. ही पद्धत अत्यंत धोकादायक ठरू शकते. फुगलेल्या शिरांवर जोरात मालिश केल्यास शिरा फुटून अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो किंवा रक्ताची गुठळी पुढे सरकू शकते. गरम पाण्यामुळे शिरा अधिक रुंद होतात.
आजच्या आधुनिक काळात कामाचे स्वरूप बदलल्यामुळे तासन्तास एकाच जागी उभे राहणे किंवा खुर्चीवर बसून काम करणे अत्यंत सामान्य झाले आहे. या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या अनेक आजारांपैकी एक महत्त्वाचा विकार म्हणजे ‘व्हेरिकोज व्हेन्स’ (Varicose Veins) होय. पायांच्या त्वचेखाली निळसर जांभळट रंगाच्या आणि गाठीसारख्या फुगलेल्या रक्ताच्या शिरा दिसणे ही या आजाराची मुख्य ओळख आहे. सुरुवातीला या समस्येकडे केवळ पायांचे सौंदर्य बिघडवणारी गोष्ट म्हणून पाहिले जाते, पण वेळेत योग्य काळजी न घेतल्यास यातून गंभीर वैद्यकीय समस्या निर्माण होऊ शकतात. व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे कोणती आणि आधुनिक वैद्यकशास्त्रात यावर कोणते प्रभावी उपाय उपलब्ध आहेत हे सविस्तर समजून घेऊ या.