सुजाता नेरुरकर
साहित्य
फ्राइड नूडल्ससाठी
पाच कप पाणी, अर्धा टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, २ पाकिटे नूडल्स (हक्का किंवा इन्स्टन्ट नूडल्स), नूडल्स तळण्यासाठी तेल.
चायनीज भेळेसाठी
तीन टेबलस्पून तेल, ४-५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, १ इंच बारीक चिरलेला आले तुकडा, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप बारीक चिरलेली कांदापात, १ मध्यम आकाराची चिरलेली सिमला मिरची, १ कप चिरलेला कोबी, २ टेबलस्पून शेजवान सॉस, २ टेबलस्पून टोमॅटो सॉस, १ टीस्पून सोया सॉस, १ टेबलस्पून व्हिनेगर, अर्धा टीस्पून कुटलेले मिरे, पाव टीस्पून मीठ.
प्रथम फ्राइड नूडल्स तयार करून घ्यावेत. एका पॅनमध्ये ५ कप पाणी, १ टीस्पून तेल व अर्धा टीस्पून मीठ घालून पाण्याला उकळी आणावी. पाणी उकळले की त्यामध्ये नूडल्स शिजवून घ्यावेत. नूडल्स शिजलेत की नाही हे पाहण्यासाठी बोटांनी दाबून बघावेत. खूप शिजले तर मऊ होतील. नूडल्स शिजल्यावर त्यामध्ये १ मोठा ग्लास थंड पाणी घालावे, त्यामुळे नूडल्स शिजण्याची प्रक्रिया थांबेल. शिजलेले नूडल्स चाळणीवर काढून वरून अजून थंड पाणी घालावे व निथळत ठेवावेत, म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल.
एका कढईमध्ये १ वाटी तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडे थोडे नूडल्स घालून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून एका पेपरवर पसरवून ठेवावेत. नंतर हाताने थोडे क्रश करून घ्यावेत.
चायनीज भेळ करण्यासाठी ३ टीस्पून तेल तापवून त्यात थोडा लसूण कुटून घालावा. मग आले थोडे परतून घ्यावे. अनुक्रमे कांदा व कांदापात घालून थोडे परतावे. मग गाजर, सिमला मिरची व कोबी घालून पुन्हा थोडे परतून घ्यावे. त्यात शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, मिरपूड व मीठ घालून मिक्स करावे. हे जिन्नस घातल्यावर विस्तव मोठा करावा. मग त्यामध्ये नूडल्स मिक्स करावेत. चायनीज भेळ सर्व्ह करताना वरून थोडा पातीचा कांदा घालून सर्व्ह करावी.